मुंबई : बहुप्रतीक्षित 'पानिपत' चित्रपटाचा ट्रेलर अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. यात अर्जुन कपूर, संजय दत्त आणि क्रिती सेनन मुख्य भूमिकेत आहेत. आशुतोष गोवारिकर यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. ट्रेलरमध्ये जबरदस्त अॅक्शन पाहायला मिळत आहे.

"मराठा, हिंदोस्तान के वो योद्धा, जिनके लिए उनका धर्म और कर्म उनकी वीरता है", या संवादाने ट्रेलरला सुरुवात होते. यावरुच चित्रपटात दमदार डायलॉग्स ऐकायला मिळणार आहेत. 'पानिपत'साठी भव्यदिव्य सेट तयार करण्यात आला आहे. ट्रेलरमध्ये अर्जुन कपूर आणि क्रिती सेनन यांची केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. यात मोहनीश बहल यांचीही प्रमुख भूमिका आहे. तर संजय दत्तचा खलनायकी अवतार पाहायला मिळतोय.

क्रिती सेननचा मराठमोळा अंदाज
ट्रेलरमध्ये अभिनेत्री क्रिती सेनन मराठमोळ्या रुपात दिसली आहे. मराठी संवादही ती बोलताना दिसत आहे. क्रिती चित्रपटात सदाशिवराव भाऊ यांची पत्नी पार्वतीबाईंची भूमिका साकारत आहे. तर, अर्जून कपूर सदाशिवराव भाऊंच्या भूमिकेत दिसत आहे.

स्पेशल रिपोर्ट : पाणीपतच्या पाऊलखुणा



संजय दत्त-अर्जून कपूर आमने-सामने
संजय दत्त आणि अर्जुन कपूर यांचे लूक्सही उत्सुकता निर्माण करणारे आहेत. संजय दत्त अहमदशाह अब्दालीची भूमिका साकारत आहे. यात तो एका क्रूर शासकाच्या रुपात दिसतोय. याअगोदर काल म्हणजे ४ नोव्हेंबरला पोस्टर्स रिलीज करुन मुख्य पात्रांची ओळख करुन देण्यात आली होती. काही मिनिटांतच लाखो लोकांनी हा ट्रेलर पाहिला आहे.

पानिपतच्या तिसऱ्या लढाईवर आधारित चित्रपट -
हा चित्रपट पानिपतच्या तिसऱ्या व अखेरच्या लढाईवर आधारीत आहे. ही लढाई 14 जानेवारी 1761 साली अब्दाली आणि मराठ्यांमध्ये हरयाणा राज्यातील पानिपत या ठिकाणी झाली होती. 18 व्या शतकातील महत्वांच्या लढायांमध्ये याचा समावेश होतो. या लढाईत मोठ्या प्रमाणात नरसंहार झाला होता. मराठा हे युद्ध हारले मात्र, त्यानंतर कधीही अब्दालीने भारतावर आक्रमण केले नाही.