OTT Release This Week : वीकेंडच्या सुट्टीच्या दिवशी घरी थांबून ओटीटीवर चित्रपट, वेब सीरिज पाहणार असाल तर तुम्हाला चांगला पर्याय मिळणार आहे. चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहण्याची संधी हुकली असेल तर या आठवड्यात ओटीटीवर तुम्हाला थिएटरमध्ये धुमाकूळ घालणारा चित्रपट पाहता येणार आहे.
एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात ओटीटीवर चांगले चित्रपट, वेब सीरिज रिलीज होणार आहेत. पाहुयात या आठवड्यात ओटीटीवर रिलीज होणाऱ्या चित्रपटांची यादी...
आर्टिकल 370
जम्मू-काश्मीर राज्याला विशेष राज्याचा दर्जा देणारे अनुच्छेद 370 रद्द करण्याचा सरकारचा निर्णय, दहशतवादी कारवाया, सुरक्षा यंत्रणांचा तपास अशा मुद्यांभोवती चित्रपटाचे कथानक आहे. चित्रपटात यामी गौतम मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटाने थिएटरमध्ये चांगली कमाई केली होती.
सायलेन्स- 2
'सायलेन्स 2' हा चित्रपट मर्डर मिस्ट्री थ्रिलर चित्रपट आहे. यामध्ये अभिनेता मनोज वाजपेयी हा एसीपी अविनाशच्या भूमिकेत आहे. प्राची देसाईदेखील या चित्रपटात आहे. 'सायलेन्स' हा चित्रपट 2021 मध्ये प्रदर्शित झाला होता. त्यावेळी प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला होता. आता 'सायलेन्स 2'कडून प्रेक्षकांना अपेक्षा आहेत. चित्रपटगृहात प्रदर्शित न होता थेट ओटीटीवर प्रदर्शित होणारा हा मनोजचा पाचवा चित्रपट आहे.
ड्यून 2
'ड्यून 2' हा चित्रपट सध्या रेंटल स्कीमनुसार उपलब्ध होणार आहे. या चित्रपटासाठी प्राइम सदस्यांनादेखील रक्कम खर्च करावी लागणार आहे. 'ड्यून 2' हा चित्रपट हिंदी आणि इंग्रजी भाषेत उपलब्ध आहे.
द टुरिस्ट सीझन 2
'द टुरिस्ट सीझन 2' ही सीरिज एका आयरिश व्यक्तीच्या अवतीभवती फिरतो. एका ऑस्ट्रेलियन रुग्णालयात स्मृतीभ्रंशाने आजारी होतो. आपल्या ओळख, जुन्या आठवणी जागवण्याच्या प्रयत्नात त्याला त्याच्या भूतकाळातील काळ्या आठवणींना सामोरे जावे लागते. या सीरिजमध्ये जेमी डोर्नन मुख्य भूमिकेत आहे. ही वेब सीरिज 19 एप्रिल रोजी लायन्सगेट प्लेवर रिलीज होणार आहे.
सी यू इन अनदर लाईफ
ही स्पॅनिश क्राईम ड्रामा मिनी सीरिज आहे. या सीरिजमधील कथा एका सत्य घटनेवर आधारीत आहे. सी यू इन अनदर लाइफ ही सीरिज 17 एप्रिलपासूनच डिस्नी प्लस हॉटस्टार प्रदर्शित झाली आहे.
ड्रीम सिनेरियो
'ड्रीम सिनेरियो' क्रिस्टोफर बोर्गली यांनी लिहिलेला आणि दिग्दर्शित केलेला 2023 सालचा अमेरिकन ब्लॅक कॉमेडी काल्पनिक चित्रपट आहे. एका शास्त्रज्ञाच्या स्वप्नात अचानकपणे हजारो लोक स्वप्नात दिसू लागतात, त्यानंतर त्याच्या आयुष्यात अनेक घडामोडी घडतात.
सायरन
'सायरन' हा चित्रपट एका रुग्णवाहिकेच्या चालकाच्या अवतीभवती फिरणारा आहे. हा रुग्णवाहिकेचा चालक एका गुन्ह्यात तुरुंगात अडकतो आणि तुरुंगातून सुटका होण्याची प्रतिक्षा करत असतो. मात्र, यामध्ये 14 वर्षांचा कालावधी लागतो. 'सायरन' हा चित्रपट 19 एप्रिल रोजी डिस्नी प्लस हॉटस्टारवर रिलीज होणार आहे.