मुंबई : अब्जाधीश एलॉन मस्क (Elon Musk) येत्या 21 आणि 22 एप्रिल रोजी भारतात येणार आहेत. आपल्या या भेटीमध्ये ते पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची भेट घेणार आहेत. मस्क  यांच्या टेस्ला (Tesla) या कंपनीकडून इलेक्ट्रिक कारनिर्मिती केली जाते. हीच कंपनी भारतात आपला कारखाना उभारण्याचा विचार करत आहे. असे असतानाच मस्क हे भारत दौऱ्यावर येत असल्याने त्यांच्या या दौऱ्याला महत्त्व प्राप्त झाले आहे. दरम्यान, टेस्ला कंपनीचा भारतात गुंतवणूक करण्याचा निर्णय आणि मस्क यांची भारतभेट यामुळे काही शेअर्स तेजीत असण्याची शक्यता आहे. 


अनेक राज्यांकडून मस्क यांच्या कंपन्यांना पायघड्या


भारताच्या दौऱ्यादरम्यान, एलॉन मस्क यांच्या टेस्ला आणि स्टारलिंक इंटरनेट या दोन्ही कंपन्यांकडून मोठ्या घोषणा केल्या जाण्याची शक्यता आहे. टेस्ला कंपनीचे अधिकारी कारखाना उभारणीसाठी योग्य जागेचा शोध घेत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार या कंपनीच्या काही अधिकाऱ्यांनी नुकतेच राजस्थान सरकारशी याबाबत चर्चा केली आहे. महाराष्ट्र, गुजरात अशा अनेक राज्यांकडून टेस्ला कंपनीला गुंतवणूक करण्यासाठी आमंत्रित केले जात आहे. यात आता राजस्थानचाही समावेश झाला आहे. मस्क यांनी गेल्या आठवड्यातच त्यांचा भारत दौरा आणि मोदी यांच्या भेटीचे संकेत दिले होते. 


भारताच्या निर्णयानंतर टेस्ला भारतात येण्यास उत्सूक 


भारत सरकारने इलेक्ट्रिक वाहनांसंदर्भात आपल्या धोरणांत बदल केला आहे. एखादी कंपनी भारतात कमीत कमी 50 कोटी डॉलर्सच्या गुंतवणुकीसह भारतात आपला कारखाना चालू करण्यास उत्सूक असेल तर अशा स्थितीत आयत शुक्लात सूट देण्यात येईल, असा निर्णय भारत सरकारने नुकताच घेतला आहे. टेस्लासारख्या कंपन्यांना गुंतवणुकीसाठी आकर्षित करणे हा यामागचा उद्देश आहे.


मस्क यांच्या भारतभेटीमुळे या कंपन्यांचे शेअर्स वधणार? 


एलॉन मस्क भारतात येणार असल्यामुळे ऑटो क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्सकडे सध्या गुंतवणूकदारांचे लक्ष आहे. आगामी काळात मदरसन इंटरनॅशनल, सुप्रजित इंजीनिअरिंग, सोना बीएलक्यू प्रिसिजन फोर्जिंग्स, व्हेरॉक इंजीनिअरिंग, बॉश लिमिटेड आदी कंपन्यांच्या शेअर्सकडे गुंतवणूकदारांचे विशेष लक्ष असणार आहे. याशिवाय हिंडाल्को इंडस्ट्रीज, गुडलक इंडिया आणि व्हॅलियंट कम्युनिकेशन या कंपन्यादेखील टेस्लाशी वेगवेगळ्या मार्गाने संबंधित आहे. त्यामुळे या कंपन्यांच्या शेअर्सकडेही गुंतवणूकदारांचे लक्ष असणार आहे. 


हेही वाचा :


एलॉन मस्क भारतात येणार, कोट्यवधींची गुंतवणूक करणार? अवकाश संशोधनातही लावणार पैसा?


गुगलचा मोठा निर्णय, अनेक कर्मचाऱ्यांना दिला नारळ, 2024 मधील गुगलची दुसरी नोकरकपात


वंदे भारत ट्रेनमधून कमाई किती? RTI च्या उत्तरात रेल्वे प्रशासनानं दिली माहिती