Oscars John Cena : सगळ्या जगभरातील सिनेरसिकांचे लक्ष ऑस्कर पुरस्कार सोहळ्याकडे (Oscars Award 2024) लागले आहे. ऑस्कर पुरस्कार सोहळा दिमाखात सुरू झाला आहे. यंदाच्या पुरस्कार सोहळ्यात डब्लूडब्लूई सुपरस्टार जॉन सीना (John Cena) थेट ऑस्कर पुरस्काराच्या मंचावर आला. मात्र, त्याला पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या. मात्र, हे आश्चर्य त्याला 'नको त्या' अवस्थेत पाहून होते. ऑस्कर पुरस्काराची घोषणा करण्यासाठी जॉन सीना मंचावर थेट नग्नावस्थेत आला होता.
जॉन सीनाची ऑस्करच्या मंचावर एन्ट्री सरप्राईजिंग ठरली. सर्वोत्कृष्ट वेशभूषेचा पुरस्कार घोषित करण्यासाठी जॉन न्यूड अवस्थेत मंचावर आला. त्यावेळी त्याने गुप्तांग सर्वोत्कृष्ट वेशभूषा लिहिलेल्या बोर्डने झाकले होते. त्याच्या या एन्ट्रीने सभागृहात असलेल्यांना आश्चर्याचा धक्का बसला. जॉन सीनाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
जिमी किमेल (Jimmy Kimmel) याने जुन्या प्रसंगाची आठवण करून दिली. 1974 मध्ये ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात एका नग्नावस्थेतील व्यक्तीने रंगमंचावर प्रवेश केला होता, याची आठवण करून दिली. त्यानंतर आजही असा प्रसंग होईल का, असा प्रश्न केला. त्यानंतर सभागृहात हास्यकल्लोळ झाला.
असा परिधान केला पोषाख
जॉन सीनाच्या एन्ट्रीनंतर सभागृहात आर्श्चयाचे वातावरण होते. सर्वोत्कृष्ट वेशभूषा डिझाईन या श्रेणीतील नामांकने जाहीर होण्यास सुरुवात झाली, त्यावेळी रंगमंचावर ब्लॅक आउट करण्यात आला. त्या दरम्यानच्या काही सेकंदात बॅक स्टेज आर्टिस्ट यांनी येत जॉन सीनाला वस्त्र परिधान करण्यास मदत केली.
आतापर्यंत कोणाला मिळाला प्रतिष्ठेचा ऑस्कर पुरस्कार
ओपनहायमर, ‘बार्बी’, ‘पूअर थिंग्स’ आणि ‘किलर्स ऑफ द फ्लॉवर मून’ या चित्रपटांची यंदाच्या सोहळ्यात चर्चा आहे. दा’वाइन जॉय रँडॉल्फने ‘द होल्डओव्हर’साठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा ऑस्कर पुरस्कार पटकावला. सर्वोत्कृष्ट ॲनिमेटेड शॉर्ट फिल्मचा ऑस्कर पुरस्कार ‘वॉर इज ओव्हर’ या शॉर्ट फिल्मला मिळाला आहे.द बॉय अँड द हेरॉन’ला सर्वोत्कृष्ट ॲनिमेटेड फीचर फिल्मचा ऑस्कर मिळाला आहे. याचे दिग्दर्शन हायाओ मियाझाकी आणि तोशियो सुझुकी यांनी केले. जस्टिन ट्रायट आणि आर्थर हरारी यांना ‘ॲनाटॉमी ऑफ अ फॉल’साठी सर्वोत्कृष्ट ओरिजनल स्क्रीनप्लेचा पुरस्कार मिळाला आहे.अमेरिकन फिक्शन'ला सर्वोत्कृष्ट अडॅप्टेड स्क्रीनप्लेचा पुरस्कार मिळाला आहे. कॉर्ड जेफरसन लिखित ‘अमेरिकन फिक्शन’ने सर्वोत्कृष्ट अडॅप्टेड स्क्रीनप्लेचा ऑस्कर पुरस्कार जिंकला.