Oscar 2026: जगातील सर्वात प्रतिष्ठेचा मानला जाणारा ऑस्कर पुरस्कार पुन्हा एकदा चर्चेत आला आहे आणि यावेळी भारतीय सिनेमासाठी ही चर्चा खास ठरणारी आहे. अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अ‍ॅण्ड सायन्सेसने 2026 च्या ऑस्करसाठी पात्र ठरलेल्या चित्रपटांची प्राथमिक यादी जाहीर केली असून, या यादीत तब्बल पाच भारतीय चित्रपटांनी आपली छाप उमटवली आहे. त्यामुळे ‘RRR’नंतर पुन्हा एकदा भारत जागतिक मंचावर कमाल करणार का? याची उत्सुकता वाढली आहे.

Continues below advertisement

यंदा 317 चित्रपट ऑस्करच्या शर्यतीत पात्र 

अकॅडमीच्या माहितीनुसार, यंदा एकूण 317 चित्रपट ऑस्करच्या शर्यतीसाठी पात्र ठरले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही संख्या थोडी कमी असली, तरी मुख्य बेस्ट पिक्चर कॅटेगरीसाठी 201 चित्रपटांना एलिजिबल मानण्यात आलं आहे. नवीन ‘डायव्हर्सिटी स्टँडर्ड्स’ पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेली प्रक्रिया न पार पाडल्यामुळे काही डॉक्युमेंटरी आणि अ‍ॅनिमेशन चित्रपट या यादीत दिसत नाहीत. मात्र, यंदा भारतीय चित्रपटांचा दबदबा प्रकर्षाने जाणवतो.

या 5 भारतीय चित्रपटांकडे सगळ्यांचं लक्ष

1. कांतारा : चॅप्टर 1

Continues below advertisement

ऋषभ शेट्टीचा हा बहुचर्चित सिनेमा आपल्या मातीशी जोडलेली कथा, लोकसंस्कृती आणि दमदार मांडणीमुळे आधीच चर्चेत आहे. बॉक्स ऑफिसवर यश मिळवल्यानंतर आता ऑस्करच्या व्यासपीठावरही हा चित्रपट झळकणार का, याकडे चाहत्यांचं लक्ष आहे.

2. दशावतार

मराठी सिनेमासाठी अभिमानास्पद ठरणारी एंट्री म्हणजे ‘दशावतार’. कोकणातील पारंपरिक लोककला, निसर्ग आणि वाढत चाललेला माइनिंग व्यवसाय यांचा संघर्ष या चित्रपटात प्रभावीपणे मांडण्यात आला आहे. ऑस्करच्या यादीत ‘दशावतार’चा समावेश होणं अनेकांसाठी सुखद धक्का ठरला आहे.

3. तन्वी द ग्रेट

अनुपम खेर दिग्दर्शित हा चित्रपट साधेपणा, भावना आणि मानवी नात्यांवर आधारित आहे. हळुवार कथा आणि भावनिक आशयामुळे या सिनेमाची स्वतंत्र ओळख निर्माण झाली आहे.

4. होमबाउंड

‘होमबाउंड’ हा भारताचा अधिकृत ऑस्कर एन्ट्री चित्रपट आहे. करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनची ही निर्मिती असून, ईशान खट्टर, जान्हवी कपूर आणि विशाल जेठवा प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.

5. सिस्टर मिडनाइट

जरी हा चित्रपट यूकेच्या प्रोडक्शन हाऊसकडून बनवण्यात आला असला, तरी त्याची कथा पूर्णपणे भारतीय आहे. करण कंधारी दिग्दर्शित या सिनेमात राधिका आपटे, अशोक पाठक आणि छाया कदम यांच्या भूमिका आहेत.

ऑस्करच्या एलिजिबल यादीत नाव येणं ही केवळ पहिली पायरी आहे. पुढे नॉमिनेशनच्या अंतिम फेरीत कोणते चित्रपट पोहोचतात, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. मात्र, पाच भारतीय चित्रपटांची एकाच वेळी उपस्थितीमुळे भारतीय सिनेमा आता जागतिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचला आहे आणि त्याचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत आहे.