Mumbai Indians vs Royal Challengers Bengaluru WPL 2026 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने महिला प्रीमियर लीगच्या चौथ्या हंगामातील (WPL 2026) पहिल्याच सामन्यात मुंबई इंडियन्सचा 3 विकेट्सनी पराभव करत दणदणीत सुरुवात केली. 155 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना स्मृती मानधना आणि ग्रेस हॅरिस यांनी आक्रमक सुरुवात करून दिली होती. मात्र त्यानंतर झपाट्याने विकेट्स पडू लागल्याने सामना मुंबई इंडियन्सच्या बाजूने झुकलेला दिसत होता.
अंबानींची रिअॅक्शन व्हायरल
सामना अखेरच्या ओव्हरपर्यंत पोहोचला, तेव्हा मुंबई विजयाच्या उंबरठ्यावर होती. पण याच क्षणी नदीन डी क्लर्कने अखेरच्या चार चेंडूमध्ये असा काही खेळ दाखवला की संपूर्ण सामना पलटून गेला. एकीकडे विकेट्स पडत असताना दुसरीकडे संयमी आणि सूजबूज दाखवत क्लर्कने संघाला लक्ष्याच्या जवळ नेले. विजयी चौका मारण्यापूर्वी तिने आपले अर्धशतकही पूर्ण केले. त्यावेळी नीती अंबानींची रिअॅक्शन व्हायरल झाली.
अखेरच्या ओव्हरमध्ये काय घडलं?
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला विजयासाठी शेवटच्या 6 चेंडूमध्ये 18 धावांची गरज होती. प्रेमा रावत नॉन-स्ट्राइकवर असताना नदीन डी क्लर्कने पहिल्या दोन चेंडूवर सहज मिळणारे सिंगल्स घेण्यास नकार दिला. नताली स्किव्हर-ब्रंटने टाकलेल्या ओव्हरच्या तिसऱ्या चेंडूवर क्लर्कने शानदार षटकार ठोकला. चौथ्या चेंडूवर चौकार मारत तिने आपले अर्धशतक पूर्ण केले.
पाचव्या चेंडूवर पुन्हा एकदा षटकार लगावत तिने आरसीबीला विजयाच्या अगदी जवळ नेले. अखेरच्या चेंडूवर दोन धावांची गरज असताना नदीन डी क्लर्कने चौकार ठोकत आरसीबीला थरारक विजय मिळवून दिला. तिने 44 चेंडूमध्ये नाबाद 63 धावांची खेळी केली. या खेळीत तिच्या बॅटमधून 2 षटकार आणि 7 चौकार मारले.
आरसीबीचा ऐतिहासिक विजय
महिला प्रीमियर लीगच्या मागील तीन हंगामांमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला मुंबई इंडियन्सविरुद्ध पहिल्या सामन्यात कधीही विजय मिळवता आला नव्हता. मात्र WPL 2026 मध्ये प्रथमच आरसीबीने हा इतिहास रचला. डी. वाय. पाटील स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात स्मृती मंधानाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता.
मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी करत 154 धावा केल्या. प्रत्युत्तर आरसीबीच्या सलामीवीर जोडीने स्मृती मानधना आणि ग्रेस हॅरिस यांनी 40 धावांची भागीदारी रचली. मात्र ही जोडी फुटल्यानंतर आरसीबीचे विकेट्स सातत्याने पडत गेले. अशा कठीण क्षणी नदीन डी क्लर्कच्या 63 धावांच्या अर्धशतकी खेळीने संघाला विजयाकडे नेले. तिला अरुंधती रेड्डी (20) आणि प्रेमा रावत (8) यांनी छोट्या पण मोलाच्या खेळींची साथ दिली.
हे ही वाचा -
