Raavrambha Marathi Movie : गेल्या काही दिवसांत अनेक ऐतिहासिक सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. बॉक्स ऑफिसवर जादू दाखवण्यात हे सिनेमे यशस्वी ठरत आहेत. लवकरच 'रावरंभा' (Raavrambha) हा ऐतिहासिक सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या सिनेमाचा टीझर आऊट झाला आहे. 


'रावरंभा' या सिनेमाचा टीझर अंगावर शहारे आणणारा आहे. 'आधी स्वराज्य मग आपला संसार', 'मावळ्याचं पहिलं लग्न तलवारीशी', असे दमदार डायलॉग या सिनेमात आहेत. या सिनेमाच्या माध्यमातून इतिहासाच्या पानांमध्ये दडलेली एक अनोखी प्रेमकथा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.






'मुळशी पॅटर्न'च्या माध्यमातून आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणारा ओम भूतकर (Om Bhutkar) आणि सौंदर्यासोबत आपल्या अभिनयाने प्रेक्षकांवर छाप सोडणारी मोनालिसा बागल (Monalisa Bagal) या सिनेमाच्या माध्यमातून रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. 


'रावरंभा' कधी येणार प्रेक्षकांच्या भेटीला? (Raavrambha Release Date)


'रावरंभा' हा सिनेमा येत्या 12 मे रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. अनुप जगदाळे यांनी या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. या सिनेमात छत्रपतींच्या भूमिकेत शंतनू मोघे तर प्रतापराव गुजर यांच्या भूमिकेत अशोक समर्थ दिसणार आहे. या सिनेमातील गाणी गुरु ठाकूर आणि क्षितीज पटवर्धनने लिहली आहेत. 


अनुप जगदाळे यांनी 'रावरंभा' या सिनेमाचा टीझर शेअर करत लिहिलं आहे,"स्वराज्यासाठी तलवारीशी लगीन लागलेला 'राव' अन् त्या तलवारीची खडी ढाल 'रंभा' यांच्या रांगड्या प्रेमकहाणीचा हा उत्कंठावर्धक टीझर...12 मे पासून सर्व चित्रपटगृहात रावरंभा प्रदर्शित". 'रावरंभा' या सिनेमाचा टीझर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला असून प्रेक्षकांना आता सिनेमाची उत्सुकता लागली आहे. 


अनुप जगदाळे 'रावरंभा'बद्दल म्हणाले... (Anup Jagdale On Raavrambha Movie)


अनुप जगदाळे 'रावरंभा' सिनेमाबद्दल बोलताना म्हणाले, "इतिहासाच्या पानांमध्ये 'रावरंभा' ही सह्याद्रीच्या कड्याकपाऱ्यांतील एक दुर्लक्षित पण अनोखी प्रेमकहाणी दडली आहे. ही प्रेमकथा नुसतीच प्रेमकथा नाही तर तिला वास्तवाचे भरजरी कोंदण आहे. छत्रपती शिवाजी महाराज, त्यांच्याप्रती आणि स्वराज्याच्या प्रती असलेली निष्ठा, शौर्याची, त्यागाची आणि समर्पणाची किनार या कथेला आहे."


संबंधित बातम्या


‘रावरंभा’ चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीस; अभिनेता शंतनू मोघे साकारणार छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका