काही दिवसांपूर्वी प्रख्यात दिग्दर्शक शुजित सरकार यांनी एक ट्विट केलं होतं, त्यात त्यांनी म्हटलं होतं, की लॉकडाऊननंतर सिनेमातले इंटिमेट म्हणजे प्रणयदृश्य शूट करायचा वेगळा विचार करायला हवा. त्यांच्या या ट्विटवरून ते ट्रोलही झाले. म्हणजे, कोरोनामुळे सध्या चाललंय काय.. तुम्ही बोलताय काय असंही लोक बोलले. पण त्यांच्या बोलण्यात अजिबात तथ्य नाही असं नाही. कारण कोरोनानंतर म्हणजे लॉकडाऊन संपल्यानंतर जेव्हा सिनेमाची शुट्स पुन्हा सुरू होतील तेव्हा मराठीत काय चित्र असेल हे एबीपी माझाने काही दिग्दर्शक कलाकारांशी बोलून चाचपणी केली.

मराठीमध्ये गेल्या काही महिन्यांपासून बोल्ड विषय येऊ लागले आहेत. एडल्ट कॉमेडीही येऊ लागली आहे. बॉईज, गर्ल्स, टाकटाक, इमेल फिमेल ही त्याची काही उदाहरणं. शिवाय वेबसीरीजही आहेतच. हिंदीच्या पावलावर पाऊल ठेवत मराठी सिनेमाही बोल्ड होतोय अशात कोरोना आल्यामुळे सेफ डिस्टन्सिंगचा मुद्दा आला. शिवाय कोरोनाची भीतीही आहेच मनात. मराठीत काम करणाऱ्या अनेक दिग्दर्शक कलाकारांशी बोलल्यानंतर लक्षात येतं की निदान मराठीमध्ये अशी प्रणयदृश्य पुढची काही महिने शुट करूच नयेत असं अनेकांना वाटतं. शिवाय, सिनेमा बनवताना अनेक लोकांचा गट एकत्र आलेला असतो, त्यामुळे त्यांची टेस्ट करणं.. लोकांमध्ये लक्षणं दिसत असेल तर तातडीने कळवणं अशा गोष्टीही करायला हव्या असं अनेकांनी सांगितलं. याबाबत बोलताना टकाटक या सिनेमाचा दिग्दर्शक मिलिंद कवडे म्हणाला, 'लोकांच्या मनात कोरोनाची भीती आहे. त्यामुळे या वर्षात असे सीन शूट करताना दहादा विचार करायला हवा. शिवाय, लोकही पटकन तयार होतील की नाही हेही विचारात घ्यायला हवं. त्यापेक्षा काळजी घेतलेली बरी असं मत त्याने मांडलं.

इतक्या लवकर प्रलय होईल, असे काही वाटत नाही : संदिप खरे

आपण आत्ता रिबूट झोनमध्ये गेलो आहे. आलिंगन किंवा जवळीकीचे सीन शूट करणं लांबची गोष्ट आहे. आता एकूणच सिनेमाच शूट करणं अवघड होऊन बसलं आहे. आपल्याकडचे बरेच सिनेमे हे मुंबईतून बाहेर शूट होत असतात. अशावेळी मुंबईतून बाहेर पडणं आणि बाहेरच्या लोकांनी आपल्याला गावात घेणं हे किती जमू शकेल हे येत्या काळातच कळेल, असं दिग्दर्शक समीर आशा पाटील याने सांगितलं. त्याचवेळी ही स्थिती बदलेल असंही त्याने आवर्जून नमूद केलं.

इमेल फिमेलमध्ये बोल्ड भूमिका साकारणारी अभिनेत्री प्राजक्ता शिंदे म्हणाली, की कोरोनानंतर काही काळ इंटिमेट सीन शूट करूच नयेत. कारण, कोरोनाची लक्षणं लगेच कळत नाहीत. आपण कॅरिअरही असू शकतो. अशा सीनमुळे हे वाढीला लागेल. अशावेळी काही काळासाठी असे सीन देऊ नयेत. हा रोग ओसरल्यानंतरच असे सीन शूट करण्याचा विचार व्हावा.'

तर भाग्यश्री न्हालवे म्हणाली, सध्या जे चालू आहे ते भयानक आहे. यानंतर जे काही घडेल तेही भयानक असेल. याचा परिणाम इंटिमेट सीन शूट करताना होणार आहे. आर्टिस्ट कोण आहे.. कसा आहे. त्याची हिस्टरी काय आहे याची काळजी भविष्यात घ्यावी लागणार आहे. सिनेमात स्पर्शाची भाषा महत्वाची असते. अशावेळी बेफिकीरी ही कुणाच्या जीवावरही बेतू शकतं. म्हणून सर्वांनीच काळजी घ्यायला हवी. आणि पुढच्या वर्षातच नव्याने विचार करावा.'

Sandeep Khare | ‘चला दोस्तहो आयुष्यावर बोलू काही!’ कवी, गीतकार संदीप खरे यांच्यासोबत सुरेल गप्पा! माझा कट्टा