Oscar Awards 2024 Nitin Desai : 96 व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात (Oscar Awards 2024) दिवंगत कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई (Nitin Desai) यांना आदरांजली वाहण्यात आली. 'इन मेमोरियम' नावाच्या सत्रात जगभरातील यशस्वी दिवंगत कलावंतांचं स्मरण केलं जाते. त्यामध्ये यंदा नितीन देसाई यांचा देखील उल्लेख करण्यात आला.
2 ऑगस्ट 2023 रोजी दिग्दर्शक, कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी स्वतःचं जीवन संपवलं होतं. 'लगान' हा चित्रपट 2002 साली ऑस्करला गेला होता. त्याचे कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई होते. लगानने सर्वोत्कृष्ट परदेशी चित्रपटाच्या कॅटेगरीत अंतिम पाच चित्रपटात स्थान मिळवले होते. 'स्लमडॉग मिलेनियर' या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या चित्रपटाचं कला दिग्दर्शन देखील त्यांनीच केलं होतं.'स्लमडॉग मिलेनियर'या चित्रपट ओरिजनल स्कोअर कॅटेगरीत ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे.
नितीन देसाई यांनी संजय लीला भन्साळी यांच्या चित्रपटांचेही सेट तयार केले होते. हम दिल दे चुके सनम आणि बाजीराव मस्तानी यांसारख्या चित्रपटाचे सेट नितीन देसाई यांनी केले.राजकुमार हिरानी, विधू विनोद चोप्रा आणि आशुतोष गोवारीकर यांसारख्या चित्रपट दिग्दर्शक निर्मात्यांसोबतही त्यांनी काम केले. वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई, दोस्ताना, लगे रहो मुन्ना भाई, मुन्ना भाई एमबीबीएस, मिशन कश्मीर, जोश आणि प्यार तो होना ही था अशा गाजलेल्या चित्रपटांचे सेट देसाई यांनी तयार केले होते. आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित 'पानिपत' हा त्यांचा शेवटचा चित्रपट ठरला. तर, नितीन देसाई यांनी 'राजा शिवछत्रपती' या मालिकेची निर्मितीदेखील त्यांनी केली होती. मागील वर्षी नितीन देसाई यांनी कर्जतमधील एनडी स्टुडिओमध्ये गळफास घेत टोकाचे पाऊल उचलले होते. नितीन देसाई यांच्या आत्महत्येने एकच खळबळ उडाली होती.
दरम्यान, यंदाच्या ऑस्कर पुरस्कार (Oscar Awards) सोहळ्यावर 'ओपनहायमर' (Oppenheimer) चित्रपटाने आपला ठसा उमटवला आहे. सर्वोत्कृष्ट चित्रपटाच्या पुरस्कारावर ओपनहायनमरने आपल्या नावाची मोहोर उमटवली आहे. त्याशिवाय, ओपनहायनरने यंदाच्या ऑस्कर सोहळ्यात पाच पुरस्कार जिंकले आहेत.
अमेरिकेतील लॉस एंजलिस येथील डॉल्बी थिएटरमध्ये 96 अॅकेडमी पुरस्काराची घोषणा करण्यात आली. या पुरस्कार सोहळ्यात 'ओपनहायमर'ने ठसा उमटवला. अभिनेता रॉबर्ट डाउनी ज्युनियरला पहिला ऑस्कर पुरस्कार मिळाला. अभिनेता किलियन मर्फी याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा तर क्रिस्टोफर नोलनला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला. सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफीचा पुरस्कार Hoyte Van Hoytema याला मिळाला. त्याशिवाय, बेस्ट एडिटींग पुरस्कारावर जेनिफिर लेनने आपली मोहोर उमटवली.