Nilu Phule : मराठी रंगभूमी, तसेच मोठ्या पडद्यावर आपल्या बहारदार अभिनयाने ‘खलनायक’ वठवणारे अभिनेते निळू फुले (Nilu Phule) यांचा आज (13 जुलै) स्मृतिदिन. नायक, खलनायक, चरित्र अभिनेता अशा अनेक प्रकारच्या भूमिका त्यांनी पडद्यावर साकारल्या. मात्र, या सगळ्या भूमिकांमध्ये ते ‘खलनायक’ म्हणून अधिक ठळकपणे प्रेक्षकांच्या लक्षात राहिले. त्यांनी पडद्यावर साकारलेला ‘खलनायक’  इतका जिवंत वाटायचा की, महिला प्रेक्षक तर अक्षरशः त्यांच्या नावाने बोटं मोडायच्या. केवळ मराठीच नाही, तर हिंदी चित्रपटातही त्यांनी आपल्या अभिनयाची जादू दाखवली होती.


‘बाई वाड्यावर या...’ हा निळू फुले यांचा संवाद आजही प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहे. निळू फुले हे मराठी मनोरंजन विश्वातले अष्टपैलू कलाकार होते. चित्रपटाच्या पडद्यावर निळू फुले यांनी कोणताही आरडाओरडा न करता, किंवा मोठ्या आवाजात संवाद न म्हणता केवळ मौनाने भीती निर्माण केली होती. त्यांची पडद्यावरची एन्ट्रीचं प्रेक्षकांच्या अंगाचा थरकाप उडवत असे.


निळू फुले यांचे बालपण


नीलकंठ कृष्णाजी फुले यांचा जन्म 1930मध्ये पुण्यात झाला. निळू फुले यांचे वडील भाजी विकण्याचा व्यवसाय करत होते. यातून मिळणाऱ्या तुटपुंज्या कमाईत त्यांचे संपूर्ण कुटुंब आपला उदरनिर्वाह करत होते. निळू फुले यांचे बालपण खूपच कष्टात गेले. घरची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नसल्याने त्यांना शिक्षण देखील थांबवावे लागले होते. मॅट्रीकनंतर त्यांनी आपल्या कुटुंबाचा आर्थिक भार सांभाळण्यासाठी नोकरी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी पुण्यातील लष्करी महाविद्यालयात माळी काम करण्यास सुरुवात केली. इथे काम करत असताना त्यांना या कामाविषयी गोडी निर्माण झाली. आपण ही स्वतःची नर्सरी सुरु करावी, असं स्वप्न त्यांनी पाहिलं. मात्र, आर्थिक बाबी न जुळल्याने ते स्वप्न अपूर्णच राहिलं. या कामाचा त्यांना महिना 80 रुपये पगार मिळायचा. यातील 10 रुपये ते प्रत्येक महिन्याला राष्ट्र सेवा दलाला देत असत.


अशी झाली कारकिर्दीची सुरुवात!


संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या काळात त्यांनी सेवा दलासाठी एक वगनाट्य लिहिले होते, ज्याचे नाव होते ‘येऱ्यागबाळ्याचे काम नव्हे’. या वगनाट्यामुळे त्यांना खूप प्रसिद्धी मिळाली. इथूनच त्यांना आपल्यातील कलाकाराची जाणीव झाली आणि त्यांनी अभिनय क्षेत्रात येण्याचा निर्णय घेतला. ‘कथा अकलेच्या कांद्याची’ या नाटकातून त्यांना अभिनेता म्हणून त्यांना खऱ्या अर्थाने ओळख मिळाली. या नाटकाचे तब्बल 2000 हून अधिक प्रयोग झाले होते. ‘एक गाव बारा भानगडी’ या चित्रपटातून त्यांनी मोठ्या पडद्यावर पदार्पण केले. या चित्रपटात त्यांनी साकारलेल्या खलनायकाला एक विनोदाची लय होती. त्यांचे हे पात्र प्रेक्षकांमध्ये खूप लोकप्रिय झाले. यानंतर ‘सखाराम बायंडर’मधील त्यांनी साकारलेले खलनायक पात्र चांगलेच गाजले. ‘पुढारी पाहिजे’, ‘बिन बियांचे झाड’, ‘कुणाचा कुणाला मेळ नाही’, ‘कथा अकलेच्या कांद्याची’, ‘लवंगी मिरची कोल्हापूरची’, ‘मी लाडाची मैना तुमची’, ‘राजकारण गेलं चुलीत’ ही त्यांची नाटकं प्रचंड गाजली.


पडद्यावरचा खलनायक जिवंत केला!


‘सामना’ चित्रपटातील ‘हिंदुराव धोंडेपाटील’ ही व्यक्तिरेखा साकारून निळू फुले यांनी खलनायकाची स्वतंत्र शैली निर्माण केली. त्यांची जबरदस्त शब्दफेक, भेदक नजर, देहबोली हे सर्व त्या पाताळयंत्री, मग्रूर भूमिकेत अतिशय चपखल बसले. ‘सामना’, ‘सिंहासन’, ‘शापित’, ‘पुढचं पाऊल’, ‘अजब तुझे सरकार’ या चित्रपटांतील निळू फुले यांच्या भूमिका प्रेक्षकांच्या कायम स्मरणात राहिल्या.


केवळ खलनायकच नव्हे, तर त्यांनी प्रेमळ आणि वेळे प्रसंगी कठोर होणाऱ्या वडिलांच्या भूमिका देखील अतिशय सुंदर आणि सहजरित्या साकारल्या होत्या. ‘हळद रुसली कुंकू हसलं’ या चित्रपटात आपल्याच्या मुलाच्या कृत्यांना वैतागून त्याला गोळी घालून ठार करणाऱ्या वडिलांची भूमिका त्यांनी साकारली होती. तर, ‘गाव तसं चांगलं’ या चित्रपटात त्यांनी एका गावाचा कायापालट करण्यासाठी आणि तिथल्या लोकांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण करणाऱ्या शिक्षकाची भूमिका साकारली होती. अमिताभ बच्चन अभिनीत ‘कुली’ या चित्रपटात त्यांनी ‘नथू मामा’ हे पात्र साकारले होते. ‘एक होता विदुषक’, ‘जैत रे जैत’, ‘गांव तसं चांगलं पण वेशीला टांगलं’, ‘पिंजरा’, ‘बिनकामाचा नवरा’, ‘सिंहासन’, ‘सामना’, ‘माझा पति करोडपती’, ‘गोष्ट छोटी डोंगराऐवढी’, ‘कदाचित’, ‘मोसंबी नारंगी’, ‘बायको असावी अशी’, ‘भिंगरी’, ‘चटक चांदणी’ या मराठी चित्रपटात आणि ‘औरत तेरी यही कहानी’, ‘सुत्रधार’, ‘हिरासत’, ‘सारांश’, ‘कुली’, ‘प्रेमप्रतिज्ञा’, ‘वो सात दिन’, ‘बिजली’,’मोहरे’, ‘इन्साफ की आवाज’ या हिंदी चित्रपटांत त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या.


सामाजिक कार्यातही सहभाग


अभिनेते निळू फुले तब्बल 40 वर्ष मनोरंजन विश्वात सक्रिय होते. मनोरंजनासोबतच त्यांनी सामाजिक कार्यालादेखील हातभार लावला होता. अंधश्रद्धा निर्मूलन, हमाल पंचायत, सत्यशोधक चळवळ, दलित-आदिवासी-ग्रामीण साहित्य अशा सामाजिक गोष्टींशी त्यांचा अतिशय जवळचा संबंध होता. अनेक चळवळीत ते स्वतः सामील असायचे.


मानाच्या पुरस्कारांवर कोरले नाव!


‘हाथ लावीन तिथे सोने’ (1972), ‘सामना’ (1973),  ‘चोरीचा मामला’ (1974) या चित्रपटांसाठी सलग तीन वर्ष त्यांना महाराष्ट्र शासनाच्या पुरस्काराने गौरवण्यात आले. भारत सरकातर्फे दिला जाणारा संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार 1991मध्ये त्यांना मिळाला. ‘सुर्यास्त’ या नाटकातील अभिनयाकरता नाटयदर्पण पुरस्कार देऊन त्यांना गौरवण्यात आले होते. या व्यतिरिक्त अनेक मानाच्या पुरस्कारांवर त्यांनी आपले नाव कोरले होते. वयाच्या 78व्या वर्षी 13 जुलै 2009 रोजी कर्करोगामुळे त्यांचे निधन झाले.


हेही वाचा :


TOP 10 Entertainment News : दिवसभरातील दहा महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या


Entertainment News Live Updates 13 July : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!