Maharashtrachi HasyaJatra : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi HasyaJatra) हा कार्यक्रम प्रेक्षकांनी अगदी डोक्यावर घेतला. निखळ मनोरंजन आणि त्यातून उडणारे हास्याचे फवारे हे चित्र सध्या घराघरात आहे. या कार्यक्रमातून अनेक कलाकार प्रेक्षकांच्या भेटीला आले आणि पंसतीस देखील उतरले. अनेक नव्या कलाकारांना या कार्यक्रमाने संधी दिली. निखिल बने, दत्तू मोरे ही मंडळी विनोदी कलाकार म्हणून ओळखली जाऊ लागली. पण सुरुवातीच्या काळात या कलाकारांकडून बऱ्याच चुका व्हायच्या. 


या चुकांविषयी अभिनेत्याने नुकतच भार्गवी चिरमुलेच्या पॉडकास्टमध्ये भाष्य केलं आहे. तसेच या चुकीमुळे निखिल बने चालू स्किटमध्ये रडायला लागला होता. हा किस्सा निखिलने नुकताच शेअर केला आहे. निखिलने नेमकं काय म्हटलं सविस्तर जाणून घेऊयात. 


'सुरुवातीच्या काळात बऱ्याचदा चुकलो'


सगळ्यात जास्त चुकतं कोण यावर बोलताना निखिलने म्हटलं की, सुरुवातीच्या काळात आम्ही बऱ्याचदा चुकायचो. आमच्यामुळे स्किटही थांबायचं. मी एकदा सात ते आठ वेळा चुकलो होतो आणि मी ऑनस्टेज रडलो होतो. मला तो शब्द बोलता येत नव्हता. तो शब्द आता आठवत नाही पण मला तो उच्चारताच येत नव्हता. 


'प्रॅक्टिसमध्येच फंबल करत होतो'


त्या स्किटच्या प्रॅक्टिसमध्येच मला फंबल होत होतं. त्यामध्ये तो कॅमऱ्यामन होता. मला एक वाक्य बोलायचं होतं, त्यामध्ये एक फंबल पडलं. त्यानंतर मला असं वाटायला लागलं की, मी इथे चुकणारच आहे. ती भीती वाटायला लागली. स्किटमध्ये पहिल्यांदा त्याच वाक्यावर चुकलो, सगळे म्हणाले ठिक आहे, चल परत करु. पुन्हा दुसऱ्यांदा, तिसऱ्यांदा तिथेच चुकलो. हळू हळू सगळं वातावरण बदललं. सगळे शांत व्हायला लागले. त्यात मला प्रेशर आलं की, माझ्यामुळे संपूर्ण स्किट थांबलं आहे. चांगल्या फ्लोमध्ये आलेलं स्किट थांबलं. पाणी प्यायलो आणि परत चौथ्यांदा तिथेच चुकलो. मला घाम फुटला, मला कळतच नव्हतं. मग मी हात वर केले, म्हटलं मला जमणारच नाही. मग पुन्हा सगळे म्हणाले होईल होईल. 


'सई मॅम उठून स्टेजवर आल्या'


पाचव्यांदा परत त्याच वाक्यावर चुकलो. त्यानंतर सहाव्यांदा चुकलो तेव्हा मी रडायला लागलो. मला तो शब्दच येईना. मग सगळेच सिरिअस झाले. सई मॅम पाण्याची बॉटल घेऊन आल्या. त्यांनी म्हटलं, पाणी पी, होईल होईल, काही नाही एवढं. सगळे इकडून तिकडून आले, सगळे म्हणायला लागेल, त्याचा जास्त प्रेशर देऊ नका. हे सगळं झालं, पुन्हा म्हटलं ऍक्शन, सातव्यांदापण चुकलो. तो शब्द आठवतच नव्हता. मराठी शब्द होता. 


'एका दमता ते वाक्य म्हटलं आणि...'


मग मी जरा बाजूला गेलो आणि थोडा थांबलो. मग म्हटलं आता घेतो वाक्य आणि आठव्यांदा परत चुकलो. सलग आठ वेळा चुकलो. मग सगळ्यांनीच हात सोडले, त्यांना असं वाटलं की, जाऊदे आता नाही करणार हा, किती वेळा करेल. आठ वेळा चुकला, याशिवाय आता काही नाही होऊ शकत. मग मी पुन्हा एकदा थांबलो. जमत नव्हतं म्हणून कसंतरी व्हायला लागलं. मग म्हटलं आता करतो आणि नवव्यांदा एका दमात ते वाक्य म्हटलं. त्यावेळी सगळ्यांच्या एकदम जोरदार टाळ्या आल्या. 


ही बातमी वाचा : 


Salman Khan : गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या कोठडी मृत्यू प्रकरणाशी सलमानचा संबंध नाही, सलमान खानला हायकोर्टाचा मोठा दिलासा