मुंबई : आज के शिवाजी नरेंद्र मोदी पुस्तकावरुन भाजपवर चौफेर टीका होत असताना. या पुस्तकावर हल्लाबोल करणाऱ्या दोन टिकाकारांमध्येच वाग्युद्ध रंगलंय. सातारा गादीचे वारसदार श्रीमंत उदयन राजे, श्रीमंत शिवेंद्रराजे आणि कोल्हापूरचे छत्रपती संभाजी राजे यांना मोदींची छत्रपती शिवरायांशी तुलना मान्य आहे का? असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केला. राऊतांच्या या प्रश्नानंतर खासदार संभाजीराजेंनी संजय राऊतांना ट्विटरवरुन जोरदार प्रत्युत्तर दिलंय. उद्धवजी संजय राऊतांच्या जीभेला लगाम घाला, त्यांची मुजोरी सहन केली जाणार नाही, अशा शब्दात संभाजीराजेंनी राऊतांवर पलटवार केला आहे.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी तुलना करणाऱ्या पुस्तकावरून भाजपवर टीकेची झोड उठवली जात आहे. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी छत्रपती संभाजीराजे भोसले आणि छत्रपती उदयनराजे भोसले यांना सवाल केला आहे. शिवाजी महाराजांचा एकेरीत उल्लेख करून या महाशयांनी नरेंद्र मोदी यांची तुलना महाराजांबरोबर केली, हे भाजपात शिरलेल्या छत्रपतींच्या वंशजांना मान्य आहे का? असा प्रश्न राऊत उपस्थित यांनी केला आहे.

काय म्हणाले संजय राऊत

आज के शिवाजी नरेंद्र मोदी, असं महान पुस्तक लिहून भाजपा कार्यालयात प्रसिद्ध करणारे महाशय कोण आहेत? हेच ते जय भगवान गोयल. यांनी दिल्लीतील महाराष्ट्र सदनावर हल्ला करून शिवरायांच्या महाराष्ट्राला व मराठी माणसाला शिव्या घातल्या होत्या. शाब्बास भाजप!, असं राऊत यांनी म्हटलं आहे.


जय भगवान गोयल आधी शिवसेनेत होते. महाराष्ट्र सदनावर हल्ला करताच त्यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली. शिवाजी महाराजांचा एकेरीत उल्लेख करून या महाशयांनी नरेंद्र मोदी यांची तुलना महाराजांबरोबर केली हे भाजपात शिरलेल्या छत्रपतींच्या वंशजांना मान्य आहे का? सातारा गादीचे वारसदार श्रीमंत उदयनराजे, श्रीमंत शिवेंद्रराजे, कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे यांना हे मान्य आहे का? शिवरायांच्या वंशजांनो बोला… काहीतरी बोला…, असे देखील ट्वीट राऊत यांनी केलं आहे. निदान महाराष्ट्र भाजपनं तरी यावर भूमिका स्पष्ट करावी. छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना या विश्वात कुणाशीच होऊ शकत नाही. एक सूर्य आणि एक चंद्र आणि एकच शिवाजी महाराज… छत्रपती शिवाजी महाराज… असंही त्यांनी म्हटलं आहे.



काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती 

उद्धवजी संजय राऊतांच्या जिभेला लगाम घाला. प्रत्येक वेळी छत्रपती घरण्यावर गरळ ओकून राजकारण करत आहेत. त्यांनी आधी माहिती घ्यायला पाहिजे होती, की मी जिजाऊ जयंती, सिंदखेड राजामध्ये काय बोललो आहे ते. त्यांची मुजोरी सहन केली जाणार नाही, असं एकेरी भाषेत संभाजीराजे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना कुणाशीही करणं खपवून घेतलं जाणार नाही. नरेंद्र मोदी हे स्वकर्तृत्वाने पंतप्रधान झाले आहेत, पण त्यांची शिवाजी महाराजांशी तुलना योग्य नाही. ज्या पक्षाच्या कार्यालयात ह्या पुस्तकाचे प्रकाशन झाले, त्या पक्षाच्या अध्यक्षांनी ते पुस्तक तात्काळ मागे घ्यावे. नाहीतर त्याचे वेगळे परिणाम होतील, असा इशारा देखील संभाजीराजे यांनी दिला आहे.