बॉलिवूडमध्ये तऱ्हेतऱ्हेचे लोक काम करत असतात. सर्व वयोगटातले.. सर्व आर्थिक स्तरातले लोक इथे पाहायला मिळतात. या सगळ्यात वर असते क्रिम लेअर. म्हणजे सगळे सुपरस्टार.. त्यांचं कुटुंब.. त्यांचे मित्र.. इंडस्ट्रीमधलेच त्यांचे नातेवाईक ही सगळी मंडळी त्यात येतात. या वरच्या लेअरमध्ये एक ट्रेंड आला की तो ट्रेंड बोकाळतो. बॉलिवूडमध्ये सध्या ट्रेंड आहे तो मालदिवला जायचा. तिथे सुट्टी एन्जॉय करायला जायचं आणि तिथले फोटो सोशल मिडियावर टाकायचे आणि भरपूर हिट्स मिळवायचे. हे असं एकानं केलं की सगळी मंडळी एकापाठोपाठ तसंच करू लागतात. समाजाची स्थिती पाहता ते करणं योग्य नसलं तरी कोणी काही बोलत नाही. पण मालदिवच्या यावेळच्या ट्रिपवर एक कलाकार थेट बोलला आहे, त्याचं नाव आहे नवाजुद्दिन सिद्दीकी. 


गेल्या काही दिवसांत अनेक कलाकार मालदिवला गेले. यात श्रद्धा कपूर, जान्हवी कपूर, दिशा पटानी, टायगर श्रॉफ, अलिया-रणबीर कपूर यांचा समावेश होतो. असे बरेच आहेच. तिथे जाऊन आलेल्या काही कलाकारांनी आपल्या ट्रिपचे फोटो सोशल मीडियावर टाकले आहेत. त्यावर नवाजुद्दिन सिद्दीकी बोलता झाला आहे. बॉलिवूड हंगामा या वेबसाईटशी बोलताना तो म्हणतो, 'देशातली स्थिती फार खडतर आहे. कोव्हिडच्या केसेस वाढतायत. लोकांना खायला अन्न मिळत नाहीय. देशाची स्थिती अशी असताना, काही कलाकार मालदिवला जाऊन तिथले फोटो पोस्ट करतायत. लोकांकडे खायला पैसे नाहीयत आणि तुम्ही पैसे उडवताय. अरे जरा तरी लाज बाळगा. '


तो म्हणतो, 'हे सगळे कलाकार आपल्या सुट्टीचे फोटो पोस्ट करतायत. कारण त्यांच्याकडे बोलण्यासारखं काहीच नाहीय. अभिनयावरही ते बोलत नाहीत. कारण तसं झालं तर ते या सिस्टीममधून बाहेर पडतील. मालदिवचा तमाशा करून ठेवला आहे सगळ्यांनी. तिथे त्यांची पर्यटनादृष्टीने काय सोय आहे मला माहीत नाही. पण तुमची सुट्टी तुमच्यापुरती ठेवा. इकडे कोव्हिड पेशंट वाढतायत. थोडीतरी सहानुभूती दाखवा. '



नवाजुद्दीन सध्या आपल्या गावी बुधाना इथं आहे. मी कुठंही जाणार नाही. मी माझ्या गावीच थांबणार आहे. हेच माझं मालदिव आहे असंही तो सांगतो.