Savaniee Ravindrra : आपल्या मधाळ आवाजानं रसिकांना मंत्रमुग्ध करणारी राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त गायिका सावनी रविंद्र (Savaniee Ravindrra) हिनं तेलुगू संगीत क्षेत्रात पदार्पण केलं आहे. 'सदा नन्नु नडिपे' या तेलुगू चित्रपटामधील बरीच गाणी तिने गायली आहेत. 'सदा नन्नु नडिपे' या तेलुगू चित्रपटाचं टायटल ट्रॅक नुकतचं रिलीज झालं आहे. हे टायटल ट्रॅक प्रेक्षकांच्या पसंतीस पडलं आहे. यापूर्वी सावनीने मराठी, हिंदी,  गुजराती, तमिळ, मल्याळम, कन्नडा, कोंकणी अशा प्रादेशिक भाषांमध्ये गाणी गायली आहेत. 


सावनी तेलुगू संगीत क्षेत्रातील पदार्पणाविषयी सांगते, ‘मी सावनी ओरीजनल सिरीजमधून अनेक भाषेत गाणी गायली आहेत. यापूर्वी मी तेलुगू भाषेतील गाणी आणि जिंगल्स गायली होती. यावेळेस मी पहिल्यांदाच तेलुगू चित्रपटासाठी गाणी गायली आहेत. तेलुगू गाणं गाण्यासाठी मी तेलुगू भाषा शिकले. साऊथच्या कोणत्याही भाषा गाताना खूप चॅलेंजिंग असतं. या भाषा समजायला आणि बोलायला अवघड असतात. परंतु, मी याआधी तमिळ, मल्याळम गाणी गायली आहेत. ती गाणी रेकॉर्ड करण्याआधी मी साऊथमधील विविध गाणी सातत्याने ऐकली होती. त्यामुळे या चित्रपटातील तेलुगू गाणी गाताना मला थोडं सोप्पं गेलं. या गाण्यांमध्ये बऱ्यापैकी संस्कृत शब्द आहेत.’ 


मुंबईत पार पडलं रेकॉर्डिंग


तेलुगू गाण्यांच्या रेकॉर्डिंगविषयी बोलताना ती सांगते, ‘संगीत दिग्दर्शकाने हैदराबादवरून मुंबईत येऊन तब्बल दोन दिवसांत माझ्याकडून या तेलुगू चित्रपटातील सर्व गाणी रेकॉर्ड करून घेतली. त्यातील एक गाणं अरमान मलिकचं आहे. एक गाणं माझं आहे. एका गाण्यात मी आणि शुभंकरने डुएट गायले आहे. या गाण्यातील सर्व इमोशन्स, ताल, सूर यांकडे त्यांनी बारकाईने लक्ष दिले आहे. या गाण्यांचे रेकॉर्डींग खेळीमेळीच्या वातावरणात मुंबईमध्ये पार पडले.’



मला खूप आनंद होतोय : सावनी रविंद्र


या अनुभवाविषयी बोलताना पुढे ती म्हणते की, ‘या चित्रपटाच्या टायटल ट्रॅकचे संगीत शुभांकर याने केले आहे. तर, या चित्रपटाचा नायक आणि दिग्दर्शक प्रतिक प्रेम आहे. माझी मैत्रीण वैष्णवी पटवर्धन ही या चित्रपटाची नायिका आहे. या गाण्याचं चित्रीकरण परदेशात झालं आहे. हा चित्रपट 24 जून रोजी हैदराबादमध्ये प्रदर्शित होणार आहे. त्यानिमित्ताने माझं तेलुगू संगीत क्षेत्रात पदार्पण होत आहे. याचा मला खूप आनंद आहे.’


हेही वाचा :


Savaniee Ravindrra : गायिका सावनी रविंद्रचा मातृदिन खास, 'माँ कोई तुझसा नहीं' गाणं प्रदर्शित


Savaniee Ravindrra | माय-लेकीचा हळवा बंध, गायिका 'सावनी रविंद्र'ने लेक शार्वीसाठी गायली 'लडिवाळा’ अंगाई!