Travel : महाराष्ट्र वैविध्यतेने परिपूर्ण आहे. पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि कोकण या भागात फिरण्यासाठी एकापेक्षा एक ठिकाणं आहेत. उन्हाळ्याची सुट्टी लागताच अनेक जण बाहेर फिरायला जायचा प्लॅन बनवतात, पण आम्ही तुम्हाला सांगतो, कमी बजेटमध्येच तुम्ही आपले कुटुंब किंवा जोडीदारासोबत इथले निसर्गसौंदर्य अनुभवू शकता. महाराष्ट्रात तशी अनेक पर्यटन स्थळं आहेत. त्यापैकी आज आपण विदर्भातील एक ठिकाणाबद्दल माहिती देणार आहोत. हे ठिकाण शहरापासून दूर आणि अतिशय शांत आहे. येथील हवामान इतके आल्हाददायक आहे की येथे दररोज हजारो पर्यटक येतात. जाणून घ्या या ठिकाणाबद्दल..
महाभारत काळातील अनेक रहस्यांसाठी ओळखले जाते
जर तुम्हाला प्रवासाची आवड असेल आणि महाराष्ट्रातील लोणावळ्याला भेट देऊन कंटाळा आला असाल तर आता इतर ठिकाणी जाण्याची वेळ आली आहे. आम्ही तुम्हाला सांगतो, महाराष्ट्रातील चिखलदरा हे ठिकाण तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्यटन स्थळ ठरू शकते. महाराष्ट्रातील हे ठिकाण सुंदर तलाव, धार्मिक स्थळे आणि प्राचीन इतिहासासाठी ओळखले जाते. हे ठिकाण महाभारत काळातील अनेक रहस्यांसाठी देखील ओळखले जाते. मुंबई-पुण्यातील लोकंही येथे दृश्यांचा आनंद घेण्यासाठी येतात. जाणून घेऊया चिखलदऱ्यातील काही उत्तम ठिकाणांबद्दल-
पंचबोल पॉइंट
चिखलदऱ्यातील पर्यटकांचे सर्वात आवडते ठिकाण म्हणजे पंचबोल पॉइंट. हा पॉइंट डोंगराळ दृश्य पाहण्यासाठी ओळखला जातो. या पॉईंटच्या आजूबाजूला कॉफीचे मळे आहे, जिथे तुम्ही फिरायला जाऊ शकता. पावसाळ्यात या ठिकाणचे सौंदर्य पाहण्यासारखे आहे. तुम्ही तुमच्या जोडीदारासह, कुटुंबियांसोबत किंवा मित्रांसोबत मनोरंजनासाठी येथे येऊ शकता. शहराच्या धकाधकीच्या जीवनापासून दूर हे ठिकाण तुमच्यासाठी सर्वोत्तम डेस्टीनेशन ठरू शकते.
गुगामल राष्ट्रीय उद्यान
जर तुम्हाला वन्यजीवांची आवड असेल तर तुम्ही चिखलदरा येथील गुगामल राष्ट्रीय उद्यानाला भेट दिलीच पाहिजे. या नॅशनल पार्कमध्ये तुम्हाला हरीण, बिबट्या, सिंह असे अनेक प्राणी आणि पक्षी पाहायला मिळतील. या राष्ट्रीय उद्यानाची व्याघ्र प्रकल्पाची जागा म्हणून निवड करण्यात आली आहे. जर तुम्ही निसर्गप्रेमी असाल तर तुम्ही या ठिकाणाला नक्की भेट द्या..
भीम कुंड
तुम्ही या भीम कुंडाला मध्य प्रदेशातील ठिकाण समजू नका. कारण महाराष्ट्रातील चिखलदरा येथेही एक भीम कुंड आहे, जे पर्यटकांचे प्रमुख ठिकाण आहे. डोंगराच्या मधोमध एक मोठा तलाव आहे जो 'भीम कुंड' म्हणून ओळखला जातो. या ठिकाणाबद्दल असे म्हटले जाते की ब्रिटिशांच्या काळात हे ठिकाण ब्रिटिशांनी शोधले होते, तेव्हापासून हे पर्यटकांसाठी एक खास पर्यटन स्थळ आहे
चिखलदऱ्याचा महाभारताशी संबंध?
चिखलदरा हिल स्टेशन हे महाराष्ट्रातील विदर्भात आहे. हे मेळघाट व्याघ्र प्रकल्पाजवळ आहे आणि मोठ्या सातपुडा पर्वतराजीचा एक भाग आहे. चिखलदऱ्याबद्दल असे म्हटले जाते की महाभारताच्या वेळी पांडवांनी वनवासात काही काळ येथे घालवला होता. असेही म्हटले जाते की पांडव चिखलदऱ्यात आले तेव्हा त्यांनी विराट राजाचे सेवक म्हणून काम केले. इथल्या या वनवासात महाभारतातील कीचक नावाच्या पात्राने द्रौपदीसोबत गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावर भीमाला राग आला आणि त्याने कीचकचा वध करून या दरीत फेकले. येथे येणाऱ्या पर्यटकांना महाभारताशी संबंधित अनेक रंजक माहितीही मिळते.
देवी पॉइंट
मान्सून काही दिवसांवर येऊन ठेपलाय, अशात इथे पावसाळ्यात अनेक धबधबे आणि इतर सुंदर झरे दिसतात. जवळच स्थानिक देवी मातेचे मंदिर आहे. या मंदिरात वर्षभर पाण्याचा झरा वाहत असतो.
गाविलगड किल्ला
अमरावती जिल्ह्यात असलेला हा किल्ला 300 वर्षांपूर्वी गवळी राजाने बांधला होता. पर्यटकांना येथे केलेले कोरीव काम आणि लोखंड, कांस्य, तांबे यापासून बनवलेल्या तोफांचे दर्शन घडते.
कोठे राहायचे - येथे महाराष्ट्र पर्यटन विभागामार्फत चालवले जाणारे MTDC हॉटेल आहे. याशिवाय अनेक खासगी हॉटेल्सही माफक भाड्यात उपलब्ध आहेत.
कसे पोहोचायचे - सर्वात जवळचे विमानतळ नागपूर आहे, 240 किमी अंतरावर आहे. सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन अमरावती 100 किलोमीटर अंतरावर आहे.
काय खावे - येथे तुम्ही महाराष्ट्रीयन जेवणाचा आस्वाद घेऊ शकता. इथल्या हॉटेल्समध्ये इतर प्रकारचे खाद्यपदार्थही उपलब्ध आहेत
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
हेही वाचा>>>
Travel : महाराष्ट्रात लपलेला 'हा' समुद्रकिनारा चक्क गोव्याची अनुभूती देतो! तिन्ही बाजूंनी समुद्राने वेढलेले 'हे' ठिकाण तुम्हाला वेड लावेल..