Nana Patekar : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) यांच्या पत्नी नीलाकांती (Neelakanti) यादेखील अभिनेत्री आहेत. नीलाकांती या शेवटच्या स्टार प्रवाह वाहिनीवरील गोठ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आल्या होत्या. पण नीलाकांती यांनी त्यांचं अभिनयाचं करिअर सोडून नोकरी करण्याचा निर्णय घेतला. पण त्यांनी नानांना अभिनय क्षेत्रात येण्यासाठी खंबीर साथ दिली. त्याविषयीची अनुभव नाना पाटेकर यांनी सांगितला आहे.
नाना पाटेकर यांनी द लल्लनटॉपला दिलेल्या मुलाखतीमध्ये नीलाकांती आणि त्यांची भेट कशी झाली याविषयी देखील भाष्य केलं आहे. नीलकांती यांनी सचिन पिळगांवकर यांच्यासोबत एका सिनेमात काम केलं होतं. त्यानंतर त्यांनी कोणताही सिनेमा केला नाही. या सिनेमासाठी त्यांना पुरस्कार देखील मिळाला होता. पण त्यानंतर मात्र त्यांनी अभिनय क्षेत्राकडे पाठ फिरवली.
तिचे माझ्यावर खूप उपकार - नाना पाटेकर
तुम्ही नीलकांती यांना जात न पुछो साधु की या नाटकावेळी भेटला होता का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी म्हटलं की, होय, आमची त्या नाटकादरम्यानच भेट झाली. ती नाटकात कामही करायची आणि बँकेत अधिकारी देखील होती. तेव्हा आम्हाला एका शोचे 50 रुपये मिळायचे आणि तिला पगार अडीच हजार रुपये होता. मी जेव्हा 15 ते 20 शो करायचो तेव्हा मला 750 रुपये मिळायचे. पूर्ण महिना मी 30 शो जरी केले तरी त्याचे मला 1500 रुपये मिळायचे. त्यावेळी तिने मला म्हटलं की, तुम्हाला या क्षेत्रात करिअर करायचं असेल तर करा, माझ्या पगारातून पैसे येत आहेत. त्यामुळे तिचे खूप उपकार आहेत माझ्यावर. मी प्रोफेशन म्हणून या क्षेत्रात करिअर तिच्यामुळेच करु शकलो. पण त्यावेळी मला माहित नव्हतं की, आपण यशस्वी होऊ की नाही ते.
मी एकटाच राहत होतो - नाना पाटेकर
नीलकांती यांनी सचिन पिळगांवकर यांच्यासोबत आत्मविश्वास या सिनेमात काम केलं होतं. पण त्यानंतर त्यांनी कोणत्याही सिनेमात काम केलं नाही. त्यावर बोलताना नानांनी म्हटलं की, तेव्हा मल्हार होता, माझी आई होती, त्यामुळे तिने काम केलं नाही. मी वेगळा रहायचे, ते एकत्र राहायचे. मल्हार आणि नीलकांती एकत्र राहायचे आणि मी एकटाच राहत होतो.