Akola News अकोला : विद्येचे माहेरघर मानले जाणाऱ्या पुण्यात वाढती गुन्हेगारी, अपघातांचे सत्र, आणि नव्याने पुन्हा चर्चेत आलेले ड्रग्ज प्रकरण (Pune Drugs Case) राज्यासह देशात गाजत आहे. अशातच पुण्यातील (Pune News) सर्वात व्यस्त रस्त्यांपैकी एक असलेल्या एफ सी रोडवरील लिक्विड लेझर लाउंज या पबमधे ड्रग्ज (Drugs News) घेतलं जात असल्याचं उघड झाल्यानंतर अनेक प्रश्न निर्माण झालेत. त्यामुळे राज्याचे राजकारण देखील ढवळून निघाले आहे. अशातच या प्रकरणामुळे राज्यात पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून इतर शहरात देखील असे प्रकार तर सुरू नाही ना? याचा शोध पोलीस घेत आहे. मात्र अकोल्यात (Akola News) एक वेगळी बातमी समोर आली आहे. यात जिल्ह्यातील सर्व बार चालक मालकांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाई विरोधात आक्रमक पवित्रा घेत अकोला शहरातील सर्व बार आज बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय.


उत्पादन शुल्क विभागानंच बार चालवावेत


अकोल्यातील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयात आज बार मालकांनी ठिय्या आंदोलन केलंय. राज्य उत्पादन शुल्क विभागानं कालपासून शहरातील बारवर काही कारण नसताना  हेतुपुरस्सर कारवाई सुरू केल्याचा आरोप बार मालकांनी केलाय. यासोबतच अकोल्यातील खाजगी हॉटेल आणि धाब्यांवर सुरू असलेल्या अवैध मद्य विक्रीकडे उत्पादन शुल्क विभागानं जाणीवपूर्क दुर्लक्ष केल्याचा आरोपही अकोल्यातील बार मालकांनी केलाय. उत्पादन शुल्क विभागाच्या या धोरणाविरोधात अकोला शहरातील सर्व बार  आज बंद असणार आहेत. तर बारमालकांनी बारच्या चाव्या उत्पादन शुल्क विभागाकडे जमा केल्या आहेत. आता उत्पादन शुल्क विभागानंच बार चालवावेत, असा पवित्रा मालकांनी घेतलाय. 


संतप्त बार मालकांचे कार्यालयातच ठिय्या आंदोलन


अकोल्यातील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयात आज संतप्त बार मालकांनी ठिय्या आंदोलन केलंय. यावेळी मोठ्या प्रमाणात बार मालक उपस्थित होते. त्यामुळे या कार्यालयात काहीकाळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणाची माहिती मिळताच अकोला पोलिसांनी घटनास्थळ गाठत बार मालकांची समजूत काढली. मात्र उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाई विरोधात बार मालकांनी आपला रोष व्यक्त करत प्रशासनाने या विषयाची दखल घ्यावी, अशी मागणीही आकोल्यातील बार मालक असोसिएशनने केलीय.


इतर महत्वाच्या बातम्या