Nagraj Manjule News: नागराज मंजुळे... मराठी चित्रपटसृष्टीतला 'मिडास' असलेला दिग्दर्शक... कारण, नागराजने ज्या विषयाला हात घातला, त्याचं अगदी 'सोनं' झालं. त्याच्या चित्रपटाचे विषय अगदी समाजाला आत्मचिंतन करायला लावणारे. त्याच्या चित्रपटांनी अगदी 'कमाई'सुद्धा केली. अन् नावही कमावलं. त्याचा 'फँड्री'पासून सुरू झालेल्या प्रवासावर 'सैराट' अक्षरश: कळस चढविला. मराठी चित्रपटसृष्टीच्या इतिहासात 'ब्लॉकबस्टर सैराट'ने नागराज प्रसिद्धीच्या अगदी शिखरावर पोहोचला. शंभर कोटींच्या 'क्लब'मध्ये गेलेल्या या चित्रपटानंतर नागराजनं अमिताभ बच्चन यांना घेत हिंदीत 'झुंड' या चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटाची मोठी चर्चा झाली. आता नागराजच्या येऊ घातलेल्या 'घर, बंदूक, बिर्याणी' चित्रपटाची मोठी चर्चा आहे. स्वत: दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात नागराजने 'पोलीस इन्स्पेक्टर'ची भूमिका केली आहे. मात्र, पंचवीस वर्षांपूर्वी याच नागराजच्या आयुष्यात अस्सल पोलिसांची 'रियल भूमिका' आली होती. मात्र, हे क्षेत्रं आपलं नाही, असं म्हणत नागराजनं पोलीस प्रशिक्षण केंद्रातून थेट पलायन केलं होतं. अन हे पोलीस प्रशिक्षण केंद्र होतं अकोल्याचं. गडंकी भागातील अकोल्यातील हे पोलीस प्रशिक्षण केंद्र आहे. आज तब्बल पंचवीस वर्षांनंतर अकोल्यात आल्यानंतर नागराजने आयुष्यातील या पडद्यामागच्या 'सीन'चा गौप्यस्फोट केला आहे.
...अन नागराजनं पोलीस प्रशिक्षण सोडलं :
पंचवीस वर्षांपूर्वीचा एक दिवस... अकोल्याच्या गडंकी भागातलं पोलीस प्रशिक्षण केंद्र... रात्री किर्रर्र अंधार झालेला. दिवसभराचं प्रशिक्षण करून तो फार थकलेला. आपल्या बराकीत झोपण्यासाठी पहूडलेला नागराज प्रचंड 'अस्वस्थ' होता. त्याला 'त्या' दिवशी सोलापूर जिल्ह्यातील आपलं करमाळा तालुक्यातलं जेऊर गाव आठवत होतं. पोलीस प्रशिक्षण केंद्रासमोरच्या पुलावरून रेल्वे गेली की त्याची अस्वस्थता आणखी वाढायची. त्याची गावाची आठवण आणखी गडद व्हायची. 'त्या' दिवशी ती अस्वस्थता अधिकच होती, अन् तो विचार करू लागला. आपण येथे कशासाठी आलो?. पोलिस होऊन आयुष्यभर बंदूक, दंडा घेऊनच फिरायचं का?... हे क्षेत्र आपलं नाही?... "नागराज!, तु हे सोड.. येथून निघून जा... तु येथे पाहूणा कलाकार आहेस. तुला 'हिरो' होण्यासाठी दुसरं क्षेत्र वाट पाहतंय". नागराजनं मनाच्या आतला आवाज ऐकला. अन त्यानं दुसऱ्या दिवशीच हे सारं सोडण्याचा निर्णय घेतला. त्याच्या सोबतच्या मित्रांनांही त्यानं हा निर्णय सांगितला. अन नागराजच्या खऱ्या आयुष्यातील 'पोलिसींग'चं 'कॅरेक्टर' 13 दिवसात संपलं.
अकोल्यात आजपासून दोन दिवसीय दहावे 'अखिल भारतीय मराठी गजल संमेलन सुरू झालं'.या संमेलनाला उद्धाटक म्हणून अभिनेता दिग्दर्शक नागराज मंजुळे उपस्थित होते. या कार्यक्रमात नागराज मंजुळे यांनी बोलताना आयुष्यातील एक किस्सा सांगितला. हा किस्सा होता 'अकोला शहराशी जुडलेला. यावेळी बोलतांना नागराज फार भाऊक झाला होता. यावेळी बोलतांना नागराज मंजुळे म्हणाला की, "25 वर्षांपुर्वी सोलापूर ग्रामीणच्या भरतीत पोलीसांत भरती झालो. पुढंच ट्रेनिंग अकोल्यात होतं. 13 दिवस पोलिस प्रशिक्षण केंद्र अकोला इथे राहिलो. मात्र, मनच लागत नसल्यानं ट्रेनिंग सोडून दिलं".
लहान भावानं घेतलं अकोल्यात पोलीस प्रशिक्षण :
नागराजनंतर त्याचा लहान भाऊही पोलिसांत भरती झाला. त्याचंही प्रशिक्षण अकोल्याच्या पोलीस प्रशिक्षण केंद्रातच झालं. त्यामुळे आपल्या कुटूंबियांचं अकोल्याशी, अकोल्याच्या पोलीस प्रशिक्षण केंद्रासोबत खास भावनिक नातं असल्याचं नागराजनं यावेळी आवर्जून सांगितलं.
लवकरच अकोल्याच्या पोलीस प्रशिक्षण केंद्राला भेट देणार : नागराज मंजुळे
25 वर्षांपूर्वीच्या आठवणी जागवतांना नागराजने आज अकोल्याच्या पोलीस प्रशिक्षण केंद्राला भेट देण्याची ईच्छा व्यक्त केली. परंतू, आजचं नागराजचं अकोल्यातील कार्यक्रमांचं वेळापत्रक फार व्यस्त होतं. त्यामूळे आज जरी या पोलीस प्रशिक्षण केंद्राला भेट देता आली नसली तरी पुढच्यावेळी या ठिकाणी भेट द्यायला जाणार असल्याचे नागराज मंजुळे म्हणालेत.
आगामी 'घर, बंदुक, बिर्याणी'मध्ये नागराज साकारणार 'पोलीस इन्स्पेक्टर' :
पंचवीस वर्षांपूर्वी ज्या कामासाठी अकोल्यात आलो होतो. ते काम, स्वप्न आता आगामी सिनेमातून पूर्ण होत असल्याचं नागराज म्हणाला. पुढचा येणारा सिनेमा 'घरं, बंदूक, बिर्याणी' चित्रपटात आपण पोलीस इन्स्पेक्टरची भूमिका निभावणार असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यामुळे आता पोलीस शिपाई नव्हे तर थेट पोलीस इन्स्पेक्टर बनल्याची नागराजची ईच्छा या सिनेमातून पूर्ण होत आहे.
कविता आपल्या जगण्याचा श्वास : नागराज मंजुळे
कवितेबद्दल बोलतांना मंजुळे म्हणाले, कविता खरच माणसाला खूप बळ देते. लहानपणापासून कविता लिहायचो. तेव्हा आईचा सतत टोमणे मारत काय कामधंदे सोडून कविता लिहतोस असं विचारायची. तेव्हा आपल्याला कळत नव्हतं आपण कविता का लिहितो?. कवितेच्या मागे कशाला लागलो हे समजत नव्हतं. सिनेमा आवडीचा विषय होता म्हणून सिनेमे आवडायला लागली. खरंतर आताआता कळायला लागलंय की कवितेने आपल्याला खूप बळ दिले. तुकारामांच्या, ज्ञानेश्वरांच्या लिखाणानं खूप बळ दिल्यानंच आपण या क्षेत्रात टिकल्याचं ते म्हणालेत. त्यामुळे कविता आवडीचा अन् जिव्हाळ्याचा विषय असल्याचेही मंजुळे म्हणाले.
मराठी गजलेचे सूर अकोल्यात :
मराठी साहित्याचे दालन समृद्ध करणाऱ्या मराठी गझलेचे सूर आज अकोल्यात निनादलेत. शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ पोलिस लॉन्स येथे हे दोन दिवसीय संमेलन होत आहे. 'गजलसागर प्रतिष्ठान' मुंबई आणि तिक्ष्णगत मल्टिपर्पज वेल्फेअर सोसायटी अकोला यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या या संमेलनाचे आज सकाळी 11 वाजता सुप्रसिध्द कवी आणि सिने दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. दरम्यान यंदाचे १० वे अखिल भारतीय संमेलन आज शनिवारी व उद्या 8 जानेवारीला होत आहे. संमेलनाध्यक्ष म्हणून सुप्रसिद्ध कवी, ज्येष्ठ गजलकार आणि अमरावतीचे विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे आहेत. तर गजल सागर प्रतिष्ठानचे अध्यक्ष गजलनवाझ पंडित भीमराव पांचाळे यांच्या संकल्पनेतून हे संमेलन अकोल्यात होत आहे.