Sairat Film Re-Release : प्रसिद्ध मराठमोळे दिग्दर्शक नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांच्या सैराट या चित्रपटाची जादू आजही तेवढीच आहे. या चित्रपटातील गाणे लग्नसमारंभात तेवढ्याच उत्साहाने लावले जातात. झिंग..झिंग..झिंगाट.. गाणं लागताच राज्यातली तरुणाई थिरकायला लागते. 2016 साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. या चित्रपटाने मराठी सिनेसृष्टीतील अनेक मोठे विक्रम मोडीत काढले होते. दरम्यान, हाच चित्रपट पुन्हा एखदा सिनेमागृहांत री-रिलीज करण्यात येणार आहे. तशी माहिती अधिकृतपणे देण्यात आली आहे.
सैराट चित्रपट पुन्हा मोठ्या पडद्यावर पाहता येणार
सैराट या चित्रपटाने कमाईच्या बाबतीत अनेक रेकॉर्ड मोडले होते. विशेष म्हणजे या चित्रपटातील सर्वच गाणी तेव्हा लोकांनी तोंडपाठ केली होती. गाण्याचे बोल, या गाण्यांना अजय-अतुल या जोडगोळीने दिलेलं संगीत आणि नागराज मंजुळे यांच्या नजरेतून झालेलं चित्रीकरण सगळं काही जुळून आलं होतं. म्हणूनच या चित्रपटातील गाणे आजही तेवढेच तरुण, अजरामर वाटतात. लोक सैराट चित्रपटातील गाणी आजही तेवढ्याच आवडीने ऐकतात. विशेष म्हणजे या चित्रपटाची कथादेखील तेव्हा महाराष्ट्रातील जनतेला खूपच आवडली होती. ऑनर किलिंगच्या विषयावर बेतलेला हा चित्रपट पाहून अनेकांचे मनही सुन्न झाले होते. परश्या आणि आर्ची यांची प्रेमकथा सांगणारा हा चित्रपट व्यवस्थेला अनेक प्रश्न विचारून गेला होता. आता हाच चित्रपट तुम्हाला मोठ्या पडद्यावर पुन्हा पाहता येणार आहे.
चित्रपट री-रिलीज कधी होणार?
स्थानिक राजकारण्याची मुलगी एका खालच्या जातीतल्या मुलाच्या प्रेमात पडते आणि नंतर या दोघांचा संघर्ष कसा चालू होतो? हे सैराट चित्रपटात दाखवण्यात आलेले आहे. 2016 साली हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा लोकांनी चित्रपटगृहांत मोठी गर्दी केली होती. लोकांची गर्दी लक्षात घेऊन अक्षरश: मध्यरात्रीचे शो ठेवण्यात आले होते. तरीदेखील काही लोकांना वेगवेगळ्या कारणांमुळे हा चित्रपट सिनेमागृहात पाहता आला नाही. आता मात्र ही संधी चालून आली आहे. हा चित्रपट पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पाहता येणार आहे. तशी घोषणा झी स्टुडिओ मराठीने केली आहे. '9 वर्षांनी पुन्हा एकदा सुटणार पिरतीचं वारं! सैराटची जादू पुन्हा अनुभवा, आपल्या जवळच्या चित्रपटगृहात 21 मार्चपासून,' असं झी मराठी स्टुडिओने म्हटलंय. म्हणजेच येत्या 21 मार्च रोजी सैराट हा चित्रपट री-रिलीज होणार आहे. राज्यभरातील वेगवेगळ्या चित्रपटगृहांत हा चित्रपट पाहता येणार आहे.
दरम्यान, या चित्रपटाने 2016 साली तब्बल 110 कोटी रुपये कमवले होते. त्यामुळे आता री-रिलीजमध्ये हा चित्रपट किती गल्ला जमवणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
हेही वाचा :
महाराजांच्या खबऱ्या मुघलांना देणाऱ्या गद्दाराच्या भूमिकेत संतोष जुवेकर; किरण मानेंनी उघडं पाडलं
युझवेंद्र चहलसोबत बसली अन् क्षणात व्हायरल, भारतासाठी ठरली 'गुडलक गर्ल', 'ती' सुंदर तरुणी नेमकी कोण?