नॉर्थ अमेरिकन फिल्म असोसिएशन (NAFA) या संस्थेतर्फे नाफा मराठी सिनेमहोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे.  कॅलिफोर्नियातील सॅन होजे येथील ‘दि कॅलिफोर्निया थिएटर’ मध्ये येत्या २५ ते २७ जुलै पर्यंत हा सोहळा पार पडणार आहे. मागच्या वर्षी दोन दिवसांसाठी आयोजित करण्यात आलेला हा महोत्सव यंदा रसिकांच्या आग्रहास्तव तीन दिवस रंगणार आहे. आणि या तीनही दिवसांत विविध कार्यक्रमाची रेलचेल असणार आहे. 

पहिल्या दिवशी म्हणजेच २५ जुलैला रेड कार्पेट रजिस्ट्रेशन झाल्यानंतर मुख्य प्रवेशद्वारातून रेड कार्पेट एन्ट्री दिली जाणार आहे, त्यानंतर ‘फिल्म अवार्ड्स नाईट’या ग्लॅमरस पुरस्कार सोहळ्याला सुरुवात होईल. लोकप्रिय मराठी कलावंतांसोबत भेटण्याची, बोलण्याची त्यांच्यासोबत छायाचित्रे काढण्याची संधी अमेरिकेतील रसिक प्रेक्षकांना या रजनीमध्ये मिळणार आहे. यावेळी कलावंतांना विविध पुरस्कार दिले जाणार आहेत. अमेरिकेतील स्थानिक कलावंत आणि तंत्रज्ञ यांचाही या सोहळ्यात सन्मान केला जाणार आहे. या सोहळ्याला महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय सांस्कृतिक मंत्री ॲड. आशिष शेलार यांची विशेष उपस्थिती असणार आहे.

दुसऱ्या दिवशी म्हणजेच २६ जुलै रोजी अभिनेते सचिन खेडेकर यांच्याशी खास संवाद सोहळा आयोजित करण्यात आलाय. यावेळी उपस्थित रसिकांशी सचिन खेडेकर मनमोकळ्या गप्पा मारतील. यानंतर  ‘नाफा वर्ल्ड प्रीमियर्स’ अनेक मराठी सिनेमांचं स्क्रिनिंग पार पडणार आहे. त्यात संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई, स्नोफ्लॉवर, 'नाफा'ची निर्मिती असलेल्या 'सबमिशन', 'योगायोग' आणि 'द गर्ल विथ रेड हॅट' या लघुपटांचे प्रीमियर शो होतील.

 त्यानंतर अमेरिकेतील स्थानिक कलावंतांसोबत चर्चासत्र पार पडणार असून त्यात श्रीयुत मिरजकर, हर्ष महाडेश्वर, संदीप करंजकर यांच्याशी डॉ. गौरी घोलप संवाद साधणार आहेत.  यानंतर ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांच्या आत्मचरित्राचं मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेतील नव्या आवृत्तीचं प्रकाशन पार पडणार आहे. त्यासोबतच अमोल पालेकर आणि संध्या गोखले यांच्याशी खास गप्पा रंगणार आहेत.  

त्यासोबतच २७ जुलै रोजी  ‘नाफा’ विनिंग 'शॉर्टफिल्म्सचे स्क्रिनिंग होणार असून त्यामध्ये ‘डंपयार्ड’, 'राडा', 'बिर्याणी' या तीन शॉर्टफिल्म्स पहायला मिळणार आहेत. त्यापाठोपाठ 'छबिला', 'रावसाहेब' आणि 'प्रेमाची गोष्ट २' या मराठी चित्रपटांचे 'नाफा वर्ल्ड प्रीमियर' होतील. तसेच 'स्टुडंट स्पॉटलाईट' विभागातील शॉर्टफिल्म 'चेंजिंग रूम', 'रेबेल', 'काजू कतली' आणि 'द अनाटॉमीय ऑफ द डे' यांचे विशेष स्क्रिनिंग होणार आहे. या मनोरंजनासोबतच सन्मानीय जेष्ठ अभिनेते दिग्दर्शक अमोल पालेकर, मधुर भांडारकर, महेश कोठारे, डॉ. मोहन आगाशे, सचिन खेडेकर, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, अवधूत गुप्ते, आदिनाथ कोठारे व वैदेही परशुरामी यांच्यासोबत पॅनल डिस्कशन होणार आहे.

यासोबतच अवधूत गुप्तेच्या गाण्यांचा आस्वाद रसिकांना घेता येणार असून बॉलिवुडचे आघाडीचे दिग्दर्शक मधुर भांडारकरांचा वास्तववादी सिनेमासंदर्भातला मास्टर क्लास, चित्रपटांमध्ये कथनात्मक प्रभाव वाढविण्यासाठी कलात्मकता, इमोशन्स सोबत तंत्रज्ञानाचा वापर' यावर डॉ. पराग हवालदार, 'क्रॉसिंग बॉर्डर्स: सिनेमा आणि स्थलांतर यांच्यातील जीवन' यावर प्रख्यात अभिनेत्री अश्विनी भावे, 'मराठी चित्रपटातली विनोदी आणि अद्भुत दुनिया' हा विषय घेऊन महेश कोठारे रसिक प्रेक्षक आणि नवोदित कलाकार, तंत्रज्ञांना मार्गदर्शन करतील.   २७ जुलैला 'सो कुल लाईफ' : अर्थात अ जर्नी विथ सोनाली कुलकर्णी' त्यांच्यानंतर 'अभिनयातील स्थित्यंतरे' कशी असतात यावर स्वप्नील जोशी, 'व्हाइस, प्रेझेन्स आणि ट्रुथ' बद्दल सचिन खेडेकर आणि 'कॅमेऱ्यामधून आयुष्याकडे बघताना' नेमका काय दृष्टीकोन हवा याबद्दल डॉ. मोहन आगाशे त्यांच्या खुमासदार शैलीत मास्टर क्लास घेणार आहेत.

 राष्ट्रीय सुवर्णकमळ विजेत्या 'देऊळ' आणि 'भारतीय' या चित्रपटांचे राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त निर्माते अभिजीत घोलप यांच्या दूरदृष्टी संकल्पनेतून 'नॉर्थ अमेरिकन मराठी फिल्म असोशिएशन' (NAFA) या संस्थेची स्थापना गेल्यावर्षी अमेरिकेत झाली. आणि या संस्थेद्वारे पार पडणारा हा महोत्सव म्हणजे रसिकांसाठी मेजवानी ठरणार आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

VIDEO प्राजक्ता माळीसोबत फोटो काढण्यासाठी चाहत्याचा अट्टाहास, बंद होत असलेली लिफ्ट थांबवली, काय घडलं?