Eknath Khadse on Girish Mahajan : गेल्या काही दिवसांपासून भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse ) ऐकमेकांवर जोरदार आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहे. आज गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे आणि प्रफुल्ल लोढाचा फोटो ट्वीटवर पोस्ट करत एकनाथ खडसेंना डिवचले होते. यानंतर एकनाथ खडसे यांनी त्यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. मंत्री गिरीश महाजन हे देवेंद्र फडणीस यांचे पाय चाटतात, त्यांच्या मागे पुढे फिरतात, आपण त्यांच्या सारखे केले नाही. त्यांच्यामुळेच मला भाजपबाहेर जावे लागल्याचा खळबळ जनक खुलासा एकनाथ खडसे यांनी केला आहे.

मी तुमच्यासारखं मुख्यमंत्र्यांच्या मागे फिरत नाही 

गिरीश महाजन यांनी माझा जो फोटो ट्विट केला आहे तो बोलका फोटो नाही, बोलका फोटो ट्विट करा जे मी केलं ते करा असे खडसे म्हणाले. मीही तुमचे अनेक फोटो देऊ शकतो की या गुलाबी गोष्टी कोणासोबत केल्या असल्याचे खडसे म्हणाले. योग्य वेळ येऊ द्या, असा सवाल खडसेंनी गिरीश महाजन यांना केला आहे.  महाजन म्हणताय लोटांगण तुम्ही घालता दिल्ली दरबारी. मी तुमच्यासारखं मुख्यमंत्र्यांच्या मागे फिरत नाही कुठेही लोटांगण घालत नाही असे खडसे म्हणाले. देवा भाऊचे पाय मी चाटत नाही असे खडसे म्हणाले. 

 गिरीश महाजन यांच्या वादामुळं भाजपमधून मला बाहेर जावं लागलं

भाजपातून गिरीश महाजन यांच्या वादामुळं मला बाहेर जावं लागल्याचे खडसे म्हणाले. मी 40 वर्ष रक्ताचं पाणी करुन भाजप पक्ष वाढवला आहे.  हे सगळ्या महाराष्ट्राला माहीत असल्याचंही खडसे यांनी म्हटलं आहे. 

नेमकं काय म्हणाले होते गिरीश महाजन?

गिरीश महाजन यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटले आहे की, एकनाथ खडसे... तुमच्या या "गुलाबी गप्पा" कोणासोबत रंगल्या आहेत? ये रिश्ता क्या कहलाता है? तुमचे हे षडयंत्र जनतेसमोर उघड होतंय. हाच तो प्रफुल्ल लोढा ज्याला तुम्ही दारूडा बोलला होतात? हाच तोच प्रफुल्ल लोढा ज्याने तुमच्यावर स्वतःच्या मुलाच्या खुनाचा आरोप केलेला आहे. 2019 ते 2022 च्या दरम्यान अश्या खोट्या पुराव्यांचा आधारे सत्तेचा गैरवापर करून तुम्ही माझ्यावर असंख्य आरोप केले. त्या प्रत्येक आरोपाची चौकशी झाली, अगदी आर्थिक गुन्हे शाखेकडूनही माझी चौकशी झाली, पण त्यातून काहीही निष्पन्न झाले नाही. मी निर्दोष आहे हेच वारंवार सिद्ध झाले. याबद्दल सविस्तर बोलेलच... आता तुमच्याच म्हणण्यानुसार जो लोढा दारूडा आहे, त्याच प्रफुल्ल लोढाचा आधार घेऊन माझ्यावर बिनबुडाचे आरोप करताय? एकनाथ खडसे. काय तुझी ही व्यथा, असे म्हणत त्यांनी एकनाथ खडसे यांच्यावर निशाणा साधलाय.

महत्वाच्या बातम्या:

Girish Mahajan on Eknath Khadse : एकनाथ खडसे, तुमच्या या "गुलाबी गप्पा" कोणासोबत रंगल्यात? ये रिश्ता क्या कहलाता है? गिरीश महाजनांनी नाथाभाऊ अन् प्रफुल लोढाचा फोटोच बाहेर काढला