मुंबई: आपल्या सुरेल आणि काळजाचा ठाव घेणाऱ्या गायकीने गेली अनेक वर्षे रसिक श्रोत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ गजल गायक पंकज उधास (Pankaj Udhas) यांचे सोमवारी दीर्घ आजाराने निधन झाले. ते 72 वर्षांचे होते. पंकज उधास यांची कन्या नायाब उधास यांनी याबद्दलची माहिती दिली. पंकज उधास यांच्या जाण्याने भारतीय गझल गायकीच्या क्षेत्रातील एक महान गायक काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना व्यक्त होत आहे. त्यांच्या जाण्याने संगीत क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.
17 मे 1951 रोजी गुजरातमधील जेतपूर येथे पंकज उधास यांचा जन्म झाला होता. त्यांनी गायलेली अनेक गाणी आणि गझली आजही श्रोत्यांच्या स्मरणात आहेत. गेल्या काही काळापासून पंकज उधास यांची प्रकृती ठीक नव्हती. अखेर सोमवारी सकाळी ११ वाजता ब्रीच कँडी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. पंकज उधास यांच्या निधनाच्या बातमीने त्यांचे चाहते शोकाकूल झाले आहेत. सोशल मीडियावर त्यांच्या चाहत्यांकडून पंकज उधास यांची गाणी आणि त्यांच्या आठवणींना उजाळा दिला जात आहे.
पंकज उधास यांना डॉक्टर व्हायचे होते पण...
पंकज उधास हे भारतीय गझल गायकीतील प्रतिष्ठित नाव होते. त्यांच्या अनेक गाण्याने रसिक प्रेक्षकांना भुरळ घातली होती. मात्र, मितभाषी असलेले पंकज उधास कायमच प्रसिद्धीच्या झोतापासून दूर राहिले. पंकज उधास यांनी मध्यंतरी एका मुलाखतीत, आपल्याला तरुणपणी डॉक्टर व्हायचे होते, असे सांगितले. त्यादृष्टीने पंकज उधास यांनी वैद्यकीय शिक्षण घेण्याची तयारी सुरु केली होती. परंतु, याचदरम्यान त्यांचा संगीत क्षेत्रातील प्रवास सुरु झाला आणि त्यांचे डॉक्टर व्हायचे स्वप्न मागे पडले.
पंकजा उधास यांची गाजलेली गाणी
* चिठ्ठी आयी है
* जिये तो जिय कैसे
* चुपके चुपके
* और आहिस्त किजिए बाते
* ना कजरे की धार
* आप जिनके करीब होते है
* वो लडकी याद आती है
* घुंगरू तुट गए
* चांदनी रात मे
* एक तरफ उसका घर
* चांदी जैसा रंग
* थोडी थोडी पिया करो
* मयखाने से शराब से
* दिवारो से मिलक रोना अच्छा लगता है
आणखी वाचा
गझल नि:शब्द झाली! ज्येष्ठ गायक पंकज उधास यांचे दीर्घ आजाराने निधन