मुंबई : लॉकडाऊननंतर आता पुन्हा एकदा जनजीवन पूर्वपदावर येऊ लागलं आहे. हळूहळू मेट्रो, रेल्वे, बस, कार्यालयं सुरू होत असताना याला सिनेमागृहंही अपवाद ठरलेली नाहीत. आता चित्रपटगृहंही खुली झाली असून 50 टक्के प्रेक्षकसंख्येसह त्यांना परवानगी देण्यात आली आहे. आता लोकांनाही थिएटरमध्ये येण्याची सवय व्हावी आणि त्यांच्यात सुरक्षेबाबतचा विश्वास वाढावा यासाठी अनेकांनी नवे चित्रपट थिएटरमध्ये रिलीज करण्यापेक्षा जुने गाजलेले चित्रपट नव्याने रिलीज करण्याचा निर्णय घेतला आहे.
जवळपास नऊ महिन्यांनंतर पुन्हा एकदा थिएटर्स खुली झाली असून लोकांना सिनेमात खेचण्यासाठी पुन्हा एकदा काही मराठी चित्रपट थिएटरमध्ये दाखल झाले आहेत. यात प्रवीण तरडे दिग्दर्शित 'मुळशी पॅटर्न', प्रसाद ओक दिग्दर्शित 'हिरकणी', दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित 'फत्तेशिकस्त' आणि प्रियदर्शन जाधव दिग्दर्शित 'चोरीचा मामला' हे चित्रपट पुन्हा एकदा थिएटरमध्ये दाखल झाले आहेत. याबद्दल अधिक माहिती देताना फत्तेशिकस्त चित्रपटाचे दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर म्हणाले, 'लोकांमध्ये सुरक्षेबाबत एक विश्वास येणं आवश्यक आहे. म्हणून आम्ही फत्तेशिकस्त पु्न्हा थिएटरमध्ये लावण्याचा निर्णय घेतला. सध्या सरसकट हा चित्रपट सर्वत्र रिलीज झालेला नाही. पण जिथे शक्य आहे तिथे आम्ही चित्रपट लावलेला आहे. यात पुणे, कोल्हापूर, नाशिक आदी भागांचा समावेश होतोय. याला प्रतिसादही चांगला असल्याचं दिसतं. बुक माय शोवर तरी माझ्या चित्रपटाला मिळणारा प्रतिसाद चांगला असल्याचं दिसतं.'
चौकशीसाठी भारती आणि हर्षला घेऊन एनसीबीची टीम रवाना, घरातील छाप्यात गांजा जप्त
मुळशी पॅटर्न हा चित्रपटही पुन्हा थिएटरमध्ये आला आहे. अनेक थिएटर्सनी आपलं थिएटर नव्यानं नेटकं करण्यावर भर दिला आहे. त्याचा एक भाग म्हणून आता यात जुने गाजलेले चित्रपट पुन्हा दाखवण्यावर भर आहे. मुळशी पॅटर्न हा चित्रपट खूपच गाजला होता. असं असलं तरी अनेकांनी तो पाहिला नाहीय. काहींनी टीव्हीवर तो पाहिला असला तरी थिएटरमध्ये हा चित्रपट पुन्हा पाहाणं हा एक वेगळा आनंद ठरतो. म्हणून या चित्रपटाला प्रतिसाद चांगला मिळेल अशी आशा चित्रपट निर्मात्यांना वाटते.
अनेक ठिकाणी थिएटरवाल्यांना चित्रपटगृहं सुरू करायची आहेत. पण नव्याने सिनेमे येण्याआधी जुने गाजलेले चित्रपट लावून ही मंडीही चाचपणी करताहेत. अशावेळी मराठी सिनेसृष्टीत गाजलेले चित्रपट लावले जातायत. महाराष्ट्रात हे चित्रपट प्रदर्शित झाले असले तरी ते चित्रपट सर्वत्र पाहायला मिळत नाहीयेत. पण काही शहरात एखाद दोन थिएटरमध्ये हे चित्रपट लागलेले दिसतात.