Mukesh Khanna On Salman Khan: टेलिव्हिजनवरची गाजलेली मालिका, 'शक्तीमान' (The Popular Television Series Shaktimaan) मधले दिग्गज अभिनेते मुकेश खन्ना (Mukesh Khanna) गेल्या काही दिवसांपासून अनेक मुद्द्यांवर रोखठोक भाष्य करत असल्याचं पाहायला मिळतंय. दूरदर्शनवरील सुपरहिरो शो 'शक्तिमान' द्वारे चाहत्यांच्या मनात आपलं अढळ स्थान निर्माण केलेले मुकेश खन्ना सध्या चर्चेचा विषय बनले आहेत. यासाठी कारण ठरतोय त्यांचा स्पष्टवक्तेपणा... गेल्या काही दिवसांपासून त्यांनी अनेक बॉलिवूड सुपरस्टार्सला फैलावर घेतलं आहे. कधी कपिल शर्मा (Kapil Sharma) तक कधी रणवीर सिंहवरुन (Ranveer Singh) त्यांनी वाद घातला होता. तर आता त्यांनी बॉलिवूडचा दबंग भाईजान सलमान खानवरच (Salman Khan) थेट निशाणा साधला आहे. त्यांनी सलमान खानच्या मानधनावर प्रश्न उपस्थित करत, निर्मात्यांना फैलावर घेतलं आहे. मुकेश खन्ना सलमान खानबद्दल नेमकं काय म्हणाले? सविस्तर पाहूयात... 

Continues below advertisement

मुकेश खन्ना अनेकदा कोणत्या ना कोणत्या मुद्द्यावर आपलं मत मांडताना दिसतात. एवढंच नाही तर, कधीकधी त्यांनी बॉलिवूडच्या उच्चभ्रू गटातील सुपरस्टार्सवर हल्लाबोल केला आहे. यावेळीही असंच काहीसं दिसून आलं आहे. खरंतर, रविवारी मुकेश खन्ना यांनी त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर 'दिल्ली फाइल्स- द बंगाल चॅप्टर'चे संचालक विवेक रंजन अग्निहोत्री यांच्या वर्तमानपत्रातील मुलाखतीचा कट शेअर केला. ज्यामध्ये विवेक अग्निहोत्री सिनेसृष्टीतील चित्रपट लेखकांच्या मूल्याबद्दल बोलले आहे.

सलमान खानवर निशाणा साधताना काय म्हणाले मुकेश खन्ना?

याबद्दल, मुकेश खन्ना यांनी पोस्टच्या कॅप्शनमध्ये सलमान खानवर निशाणा साधला आहे आणि लिहिलंय की, "ज्या दिवशी आपल्या लेखकांना सलमान खानपेक्षा जास्त फी मिळू लागेल, त्या दिवशी बॉलिवूडमध्ये चांगले चित्रपट बनू लागतील... अरे देवा, बॉलिवूडला कोण वाचवेल? अशाप्रकारे, मुकेश यांनी सलमान खानवर निशाणा साधला आहे, ज्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. 

मुकेश खन्ना यांच्या पोस्टवर अनेक नेटकऱ्यांनी सहमती दर्शवली आहे. एका युजरनं म्हटलंय की, "अगदी खरं बोललात सर...", दुसऱ्या एका युजरनं म्हटलंय की, "खूपच खरी गोष्ट बोललात, आता ती कशी घ्यायची हे समोरच्यावर निर्भर आहे...", तर तिसऱ्या एका युजरनं म्हटलंय की, "अगदी खरंय लेखकांना जास्त मानधन मिळायलाच हवं तेव्हाच ते आणखी चांगल्या कथा लिहितील..."

यापूर्वीही साधलेला सलमान खानवर निशाणा 

याधीही मुकेश खन्ना यांनी सलमानविरोधात वक्तव्य केलं होतं. 2016 साली दबंग सिनेमाला लक्ष्य करत ते म्हणालेले की, "अॅक्शन सिनेमांऐवजी लहान मुलांसाठी सिनेमे आणा..." तर दुसरीकडे नुकतीच त्यांनी शाहरुख खानची बाजूही घेतली होती. शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. याचा अनेकांनी विरोध केला होता. मात्र, मुकेश खन्ना यांनी शाहरुख खानचं कौतुक केलं होतं.