Mrunal Dusanis : कलाकार आणि ट्रोलिंग हा काही नवा विषय नाही. कधी भूमिकांमुळे, करत असलेल्या कामांमुळे तर कधी वैयक्तिक आयुष्यामुळे कलाकार हे नेटकऱ्यांच्या निशाण्यावर येतच असतात. पण अनेकदा कलाकारमंडळीही या सगळ्याकडे दुर्लक्ष करुन त्यांच्या चाहत्यांचं मनोरंजन करतच असतात. कधीतरी या ट्रोलर्सला जशास तसं उत्तरही त्यांच्याकडून देण्यात येतं. असंच उत्तर अभिनेत्री मृणाल दुसानिस (Mrunal Dusanis) हिने देखील दिलं आहे.
अभिनेत्री मृणाल दुसानिस ही जवळपास चार वर्षांनी भारतात परतली आहे. त्यानंतर आता तिला वेगवेगळ्या आशयाच्या भूमिका करण्याची इच्छा असल्याचं मृणालने अनेकदा सांगितलं आहे. आतापर्यंत मृणालने फार सोज्वळ भूमिकांमधून प्रेक्षकांची मनं जिंकलीत. पण अमेरिकेला गेल्यानंतर मृणालने अभिनयातून थोडा ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला. पण आता तिचं कमबॅक करण्यास मृणाल सज्ज आहे. नुकतीच मृणालने राजश्री मराठीला मुलाखत दिली. यामध्ये तिने तिच्या या प्रवासाविषयी आणि ट्रोलिंगविषयी भाष्य केलं आहे.
ट्रोलर्स आपल्या घरातही असतात - मृणाल दुसानिस
तू तुझ्याबद्दल काही निगेटिव्ह वाचलं आहेस का? या प्रश्नाचं उत्तर देताना मृणाल म्हणाली की, होय मी आधी युट्युबच्या खालच्या कमेंट्स वाचायचे. अशी खूप लोकं असतात, जी चुकीचं काहीतरी बोलतात किंवा फार वैयक्तिक कमेंट्स करतात. काहीकाही कमेंट्स अजुनही माझ्या लक्षात आहेत. पण मी आता ठरवलंय की ट्रोलर्सकडे लक्ष द्यायचं नाही आणि ट्रोलर्स कुठे नसतात. ट्रोलर्स घरातही असतात, आपल्या मित्र मैत्रीणींमध्ये असतात. पण त्याचा आपल्या आयुष्यावर किती परिणाम होऊ द्यायचा ही रेष आपल्या प्रत्येकाने सांभाळली पाहिजे.
मग ते खूप अवघड होतं - मृणास दुसानिस
पण आपण या ट्रोलर्सकडे लक्ष दिलं की ते खूप अवघड होऊन जातं. मग ते पर्सनल आणि प्रोफेशन लाईफ आपल्याला सांभाळता येत नाही. आपला आपल्यावरचा संयमही सुटतो. मग त्याचा आपल्या अवतीभोवतीच्या लोकांवरही परिणाम होतो. मी अशी खूप लोकं पाहिली आहेत, या गोष्टीचा विचार केल्याने त्यांच्या हातातून अनेक गोष्टी निसटल्या आहेत किंवा त्यांना त्या गोष्टीचा खूप त्रास झालाय. पण मला असं वाटतं की या गोष्टी फारश्या मनाला लावून घेऊ नयेत, असं मृणालने म्हटलं.