Mrunal Dusanis : अभिनेत्री म्हटलं की, प्रत्येक आशयाच्या भूमिका ह्या कराव्या लागतात. कधी ती सोज्वळ व्यक्तिरेखा असेल, कधी खलनायिका असेल किंवा कधी बोल्ड सीन्स असतील. या प्रत्येक भूमिकेला न्याय देणं महत्त्वाचं असतं. पण बऱ्याचदा अभिनेत्रींची एखादी ओळख झाली तर त्याच अभिनेत्रीला प्रेक्षक सहसा दुसऱ्या भूमिकेत पाहणं पसंत करत नाहीत. म्हणजे जर एखाद्या अभिनेत्रीने सोज्वळ व्यक्तिरेखेतून प्रेक्षकांची मनं जिंकली असतील,तर तिचे बोल्ड सीन्स फारसे पसंतीस उतरत नसल्याचं पाहायला मिळतंय. याचसगळ्यावर अभिनेत्री मृणाल दुसानिस (Mrunal Dusanis) हीनेही भाष्य केलं आहे.
मृणालने आतापर्यंत अनेक सोज्वळ भूमिकांमधून प्रेक्षकांची मनं जिंकली आहे. पण या मृणालला बोल्ड सीन्स करायला आवडतील का? यावर मृणालने तिचं स्पष्ट मत व्यक्त केलं आहे. मृणालने नुकतच लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीमध्ये या सगळ्यावर भाष्य केलं आहे. त्याचप्रमाणे बोल्ड सीन्स करायला हरकत नसल्याचंही तिने यावेळी म्हटलं.
मृणाल नेमकं काय म्हणाली?
मृणालने म्हटलं की, 'जशी तुम्ही एखादी व्यक्तीरेखा करता तेव्हा असं वाटतं की, ती व्यक्ती तशीच आहे. म्हणजे मी ज्या काही भूमिका केल्या आहेत, लोकांना असं वाटतं मी तशीच आहे. म्हणजे याचा अर्थ असा नाही की मी बोल्ड सीन्स करायला तयार आहे.पण कोणताही गोष्टी डिसेन्सीने दाखवायला हवी. जर ती गोष्ट डिसेन्सीने दाखवली आणि ती त्या कथेची गरजच असेल तर करायला काहीच हरकत नाही.'
उगाच काहीतरी करायचं म्हणून करायचं नाही - मृणाल दुसानिस
'तुम्ही कलाकार म्हणून काही बंधनं आणि शिस्त तुमच्या कामात ठेवायला हवी आणि तेवढी कडक शिस्तीची मी आहेच. पण जे डिसेन्सीने जाईल आणि जे अगदीच खूपच गरजेचं आहे आणि ते करायलाच हवंय, तर त्यावर आक्षेप नाहीये माझा. म्हणून उगाच काहीतरी करायचं असेल, तर मग मी त्याला तयार नसेन आणि तेवढं नाही म्हणायला मला काही वाटणार नाही', असं स्पष्ट मत मृणालने व्यक्त केलं.