Sangharsh Yoddha Manoj Jarange Patil: मराठा समाजाच्या आरक्षणासाठी (Maratha Reservation) निर्णायक लढा उभारणारे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या आयुष्यावर बेतलेला 'संघर्षयोद्धा' (Sangharsh Yoddha) चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी (Mohan Joshi) हे महत्त्वाची भूमिका साकारणार आहेत. या चित्रपटात मोहन जोशी हे रुपेरी पडद्यावर मनोज जरांगे यांच्या वडिलांची भूमिका साकारणार आहेत.
मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी अवघा महाराष्ट्र मनोज जरांगे पाटील यांनी ढवळून काढला. मनोज जरांगे पाटील यांच्या आयुष्याचा वेध "संघर्षयोद्धा" मनोज जरांगे पाटील या चित्रपटातून घेतला जाणार आहे. या चित्रपटात मनोज जरांगे पाटील यांच्या वडिलांच्या भूमिकेत ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी दिसणार आहेत.
मोहन जोशी यांनी आजवर अनेक मराठी, हिंदी चित्रपटातून दमदार भूमिका साकारल्या आहेत. खलनायकी भूमिकांपासून चरित्र भूमिकांपर्यंतचं वैविध्यपू्र्ण त्यांनी भूमिका साकारली आहे. आता मनोज जरांगे पाटील यांच्या वडिलांची भूमिका त्यांच्या आजवरच्या भूमिकांमध्ये एक लक्षणीय भूमिका ठरणार असल्याचे दिग्दर्शक शिवाजी दोलताडे यांनी म्हटले. स्वतःच्या मुलाचा संघर्ष, त्याची उपोषणं, राज्यभरातून मराठा समाजाकडून मिळणारा पाठिंबा या काळात एका वडिलांची घालमेल मोहन जोशी यांच्या सशक्त अभिनयातून आपल्याला पाहायला मिळणार असल्याचे त्यांनी म्हटले.
शिवाजी दोलताडे यांनी या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी पार पाडली आहे. सोनाई फिल्म क्रिएशन या निर्मिती संस्थेच्या गोवर्धन दोलताडे यांनी या चित्रपटाचं लेखन आणि निर्मिती केली आहे. सहनिर्माते रामदास मेदगे, जान्हवी मनोज तांबे, दत्तात्रय लोहकरे कार्तिक दोलताडे , नर्मदा सिनेव्हिजन्स हे आहेत. तर डॉ.सुधीर निकम यांनी संवाद आणि पटकथा लिहिली आहे.
चित्रपटात कोणत्या कलाकारांची मांदियाळी?
या चित्रपटात मनोज जरांगे पाटील यांची मध्यवर्ती भूमिका अभिनेता रोहन पाटील यांनी साकारली आहे.या चित्रपटात अभिनेता संदीप पाठक, सागर कारंडे, अरबाज शेख, अभिनेते मोहन जोशी, श्रीनिवास पोकळे, संजय कुलकर्णी, अभिनेत्री सुरभी हांडे, माधवी जुवेकर, विजय मिश्रा, विनीत भोंडे, सुनील गोडबोले, माधव अभ्यंकर , सोमनाथ अवघडे , किशोर चौगुले , सिद्धेश्वर झाडबुके, उर्मिला डांगे आदींच्या प्रमुख भूमिका आहेत.