Me Honar Superstar- Chhote Ustaad 3 :  स्टार प्रवाहवरील (Star Pravah) 'मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद'च्या दोन्ही पर्वांना उदंड प्रतिसाद मिळाला. त्यानंतर आता या लोकप्रिय कार्यक्रमाचं तिसरं पर्वही लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले  4 ते 14 या वयोगटातील छोटे उस्ताद आपल्या सुरांनी संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावणार आहेत. पहिल्या पर्वाप्रमाणे या पर्वातही जजच्या भूमिकेत दिसतील सुप्रसिद्ध अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक आणि गायक सचिन पिळगावकर (Sachin Pilgaonkar), लोकप्रिय गायिका वैशाली सामंत (Vaishali Samant) आणि तरुणाईचा लाडका गायक आदर्श शिंदे (Aadarsha Shinde) असणार आहेत. 


मी होणार सुपरस्टार या कार्यक्रमातून अनेक महाराष्ट्रातील अनेक छोटो गायक प्रेक्षकांच्या भेटीला येतात. विशेष म्हणजे यंदाच्या पर्वाचा पहिला भाग हा आषाढी एकादशीच्या दिवशी सुरु होणार आहे. त्यामुळे विठुनामाचा जयघोष करत कार्यक्रमाचा श्रीगणेशा होणार आहे. महाराष्ट्राला सण-उत्सवांची खूप मोठी परंपरा आहे. त्यामुळे आषाढी एकदशीपासून सुरु झालेला उत्सवाचा माहोल अगदी वर्षभर सुरु असतो. येत्या 13 जुलैपासून हा कार्यक्रम सुरु होणार आहे.  शनिवार आणि रविवार रात्री 9 वाजता छोटे उस्ताद महाराष्ट्राला भेटायला येणार आहेत. 


यंदाच्या पर्वाचं वेगळेपण काय?


यंदाच्या पर्वाचं वेगळेपण म्हणजे तीन परिक्षकांमध्ये टॉप  12 स्पर्धक विभागण्यात येणार आहेत.त्यामुळे स्पर्धकांसोबतच परिक्षकांमध्येही सुरांची स्पर्धा रंगताना दिसेल. छोटे उस्तादच्या मंचावरही सुरोत्सव साजरा होणार आहे. प्रेक्षकांसाठी छोटे उस्तादचं हे नवं पर्व म्हणजे सांगीतिक पर्वणी असणार आहे. 


यंदाच्या पर्वातही सुगंध पसरवण्याचा प्रयत्न - सचिन पिळगांवकर 


या कार्यक्रमाविषयी सचिन पिळगांवकर म्हणाले की, मी होणार सुपरस्टारचं तिसरं पर्व सुरु होतंय, ही माझ्यासाठी खूप मोलाची गोष्ट आहे. याआधी देखील या मंचावर फुलं उमलली आहेत, ज्यांचा सुगंध संपूर्ण महाराष्ट्रभर पसरला. यंदाच्या पर्वातही असाच सुगंध पसरवण्याचा प्रयत्न असेल. फक्त या पर्वातलेच नाही तर याधीच्या पर्वातली मुलंही आमच्या संपर्कात आहेत. त्यांनाही आम्ही मार्गदर्शन करण्याचा सातत्याने प्रयत्न करत असतो. या मुलांना मोठं होताना पाहताना खूप आनंद मिळतो. या पर्वात स्पर्धक तीन परीक्षरकांमध्ये विभागले जाणार आहेत. त्यांच्यावर पैलू पाडण्याचा आम्ही प्रयत्न करु. माझा आजवरचा अनुभव मी त्यांच्यासोबत शेअर करणार आहे. 


हा सुरांचा प्रवास अनुभवण्यासाठी मी खूपच उत्सुक - वैशाली सामंत


वैशाली सामंतने तिच्या भावना व्यक्त करताना म्हटलं की, ‘छोट्या दोस्तांसोबतचा हा सुरांचा प्रवास अनुभवण्यासाठी मी खूपच उत्सुक आहे. गेल्या दोन्ही पर्वांना प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळाला. लहान वयात जे शिकवलं जातं ते मनात कायमचं कोरलं जातं. आपल्या ज्ञानाचा नव्या पीढीला फायदा होतोय याचा आनंद आहे. लहान मुलं जेव्हा गातात तेव्हा अचंबित व्हायला होतं की हा एवढा आत्मविश्वास त्यांच्यात येतो कुठून. हा दैवी अनुभव आहे. इतक्या लहान वयात इतकी समज असणं याचं खरच कौतुक वाटतं मला. आमचे खूप आशीर्वाद आहेत या सर्वासोबत. 


ते सुरांनी महाराष्ट्राला थक्क करतील - आदर्श शिंदे


आदर्शने म्हटलं की, 'आदर्श शिंदे देखिल या कार्यक्रमासाठी खुपच उत्सुक आहे. छोटे उस्तादच्या नव्या पर्वाविषयी सांगताना आदर्श म्हणाला ‘मी होणार सुपरस्टार छोटे उस्तादच्या दोन्ही पर्वांना खूप प्रेम मिळालं. या कार्यक्रमातील स्पर्धक खऱ्या अर्थाने सुपरस्टार झाले. हे स्पर्धक अनेक कार्यक्रमांमध्ये देखिल परफॉर्म करतात. या मुलांचं यश मी जवळून अनुभवत आहे. नवं पर्व कधी सुरु होणार याविषयी मला सतत विचारणा होत होती. प्रेक्षकांची ही प्रतीक्षा आता संपणार आहे. या पर्वातही छोटे उस्ताद आपल्या सुरांनी महाराष्ट्राला थक्क करतील याची मला खात्री आहे.'


ही बातमी वाचा : 


Ketaki Chitale : राहुल गांधींच्या संसदेतील वक्तव्यावर केतकी चितळे संतापली, दातओठ खात म्हणाली, 'आमचे देव हिंदू...'