Rahi Anil Barves Mayasabha: राही अनिल बर्वे म्हंटलं की आठवतो तो तुंबाड.. तुंबाडचं भूत आजही कित्येकांच्या डोक्यात फेर धरून नाचतंय, आणि का नाचू नये ती कलाकृती होतीच तशी. पण ती अपेक्षा ठेऊन राहीचाच दुसरा सिनेमा मयसभा जो नुकताच रिलीज झालाय, तो पाहायला जाऊ नका.. एक स्वतंत्र सिनेमा, एक स्वतंत्र कलाकृती म्हणून तो बघा… जास्त एन्जॉय करू शकाल. या चित्रपटाने कोणताच गाजावाजा न करता प्रसिद्धी मिळवली आहे.

Continues below advertisement

राहीचा हा दुसराच सिनेमा असला तरी त्याची दिग्दर्शनाची हटके स्टाईल या चित्रपटातून जाणवते. राहीला नेहमी स्वताचं वेगळं विश्व उभं करायला आवडतं. त्या विश्वात एकदा का प्रेक्षक म्हणून आपण शिरलो की मग अवघ्या काही मिनिटांत तो आपला ताबा घेतो आणि असा खेळ रचतो की त्यातून बाहेर पडणं कठीण. तुबांडमध्ये वाडा होता. इथं मयसभा आहे. मोजून चार पात्रं, आणि अवघ्या एका रात्रीत घडणारी गोष्ट दाखवण्यात आली आहे. दीड तासात संपणारा हा सिनेमा तुमच्या मेंदुला झिणझिण्या आणल्याशिवाय राहणार नाही, एवढं मात्र नक्की.

वरवर पाहाता हा सिनेमा म्हणजे सोन्याचा शोधाचा प्रवास असला तरी अर्थातच तो तेवढ्यापुरताच मर्यादित नाही. ही प्रवृत्तींची गोष्ट आहे. स्वार्थाची, अहंकाराची, लालसेची, धूर्तपणाची, बदल्याची… त्याचबरोबर अस्सल सोनं म्हणजे नेमकं काय हे सांगणारीही गोष्ट आहे. एकीकडे सोन्याच्या हव्यासापायी भावनांचा व्यापार करणारी माणसं झीनत आणि रावराणा, त्याच भावनांसाठी सोन्याचा सौदा करणारा परमेश्वर आणि त्या सोन्याकडे ढुंकुनही न पाहाता केवळ प्रेमाच्या, मैत्रीच्या चार क्षणांसाठी तरसणारा वसु. चौघांची ही गोष्ट. कागदावर लिहिलेली वाचली किंवा कुणीतरी ऐकवली तर फार वेगळेपण नसणारी. पण या सिनेमाचं यश आहे तिच्या सादरीकरणात, आणि राही इथंच जिंकलाय.

Continues below advertisement

त्यानं जिवंत केलेली मयसभा अंगावर येते.काही काही सीन्समध्ये तर किळस वाटावी इतपत भिनते.इथला अंधार, धूर, धुरळा, जमळटं सारंच कथेला पूरक असलं तरी काही काही वेळा असह्य होतं. राहीलाही कदाचित तेच अभिप्रेत असावं. या चित्रपटात कुलदीप मामनिया आणि नूतन नागराज या दोघांची सिनेमेटोग्राफी आहे. लायटिंगच्या बाबतीत त्यांनी केलेले प्रयोग उत्तम सादर करण्यात आले. गोष्टीला ठळकपणे उतरवण्यात या दोघांचा वाटा मोठा आहे. 

कलाकारांच्या बाबतीत झीनतच्या भूमिकेत दिसणार्‍या वीणा जामकरचं कौतुक करायलाच हवं, तिची देहबोली, तिची नजर त्यात दिसणारा धूर्तपणा, लालसा सगळं सगळं अमेझिंग होतं. जावेद जाफरींनी त्यांना असं काहीतरी करण्याची जी संधी मिळाली त्याचं सोनं केलंय. आपली क्षमता दाखवून दिलीय. दीपक दामले आणि मोहम्मद समद यांचंही कौतुक करावं तितकं थोडंच. कारण सिनेमाचा डोलारा या चौघांनी आपल्या खांद्यावर सक्षमपणे पेलला आहे. 

शेवटी एकच सांगेन हा टिपिकल बॉलिवुड थ्रिलर नाहीये. डार्कनेस या सिनेमाचा प्लसपॉईंट आहे, अनेकांना तोच या सिनेमाचा विक पॉईंट वाटू शकतो, म्हणून जर तुम्हाला डार्क फिल्म आवडत असतील, ती पचवण्याची ताकद असेल आणि सगळ्यात महत्वाचं पेशन्स असतील तर आणि तरच ही मयसभा अनुभवा.  

- तीन स्टार्स.