पुणे: एकीकडे मुंबईमध्ये अजित पवारांच्या (Ajit Pawar) पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्या उपमुख्यमंत्री पदाच्या शपथविधी पार पडणार आहे, तर दुसरीकडे बारामतीमध्ये सुप्रिया सुळे (Supriya Sule) या अजित पवारांच्या आई आशाताई पवार (Ashatai Pawar) यांना भेटण्यासाठी काटेवाडी येथे पोहोचल्या आहेत. सुप्रिया सुळे (Supriya Sule) अजित पवारांच्या काटेवाडीतील घरी पोहोचल्या त्यांनी जवळपास अर्धा तास आशाताईंशी चर्चा केली आहे. अजित पवारांच्या अपघातानंतर बराच वेळ त्यांच्या आईला याबाबतची माहिती दिलेली नव्हती. बारामती, काटेवाडीसह राज्यभरात अजित पवारांच्या निधनामुळे हळहळ व्यक्त होत आहे.
आज सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहे. या शपथविधीची माहिती नाही असं शरद पवारांनी सकाळी सांगितलं आहे. मुंबईमध्ये राजकीय घडामोडी घडत असतानाच दुसरीकडे आता बारामतीतून सुप्रिया सुळे काटेवाडीला आशाताईंना भेटण्यासाठी, त्यांच्याशी बोलण्यासाठी गेलेल्या आहेत. सुप्रिया सुळे दिल्लीला जाणार आहेत. दिल्लीत अधिवेशन सुरू आहे. उद्या देशाचं बजेट पार पडणार आहे त्यासाठी त्या दिल्लीला जाणार आहेत, बारामतीला निघण्याआधी त्या अजित पवारांच्या आईला भेटण्यासाठी गेलेल्या आहेत. अजित पवारांच्या निधनानंतर पवार कुंटूबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्या अपघातानंतर पवार परिवार एकत्रित असल्याचं दिसून आलं, मात्र, आता कालपासून घडत असलेल्या घडामोडीनंतर आता पवारांच्या परिवारात दुरावा आल्याचं चित्र दिसून येत आहे. यानंतर आता सुप्रिया सुळे दिल्लीला निघण्याआधी आशाताईंना भेटण्यासाठी आलेल्या आहेत. भेटीनंतर सुप्रिया सुळे पुण्याला जाऊन तिथून दिल्लीला रवाना होणार आहेत.
उद्या देशाचं बजेट आहे, त्यासाठी मी दिल्लीला जाणार आहे, मी आत्ता पुण्याला जाणार आहे, तिथून मी दिल्लीला जाणार आहे, मी आत्ता आशाकाकींना भेटण्यासाठी आले होते, असंही जाताना सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे.
पार्थ पवार गेले शरद पवारांच्या भेटीला, हायव्होल्टेज बैठक सुरू
सुनेत्रा पवार या शरद पवार किंवा पवार कुटुंबातील इतर सदस्यांसोबत राजकीय चर्चा न करता मुंबईत गेल्याचं बोललं जात होतं. शरद पवारांनी माध्यमांशी बोलताना सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीबाबत माहिती नाही असं सांगितलं, या पार्श्वभूमीवर पार्थ पवार हे गोविंद बागेत पोहोचल्याने घडामोडींना वेग आला.
सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादीच्या विधिमंडळ गटनेतेपदी एकमताने निवड
सुनेत्रा पवार आज (31 जानेवारी) उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. आज संध्याकाळी 5 वाजता सुनेत्रा पवारांचा (Sunetra Pawar DCM Oath) शपथविधी होणार आहे. त्या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री असतील. दरम्यान या शपथविधीपूर्वी विधानभवनात राष्ट्रवादीच्या विधिमंडळ पक्षाची बैठक होतेय. या बैठकीला राष्ट्रवादीचे सर्व आमदार, मंत्री आणि नेते उपस्थित झाले आहेत. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा गटनेते पदासाठी सुनेत्रा पवार यांच्या नावाचा प्रस्ताव पक्षाचे नेते दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी मांडलाय. तर या प्रस्तावाला पक्षाचे जेष्ठ नेते म्हणून मंत्री छगन भुजबळ यांनी अनुमोदन दिलं आहे. परिणामी, सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादीच्या विधिमंडळ गटनेतेपदी एकमताने निवड झाली आहे. आता सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहे. त्यामुळे अजित पवारांच्यानंतर इथून पुढे सुनेत्रा पवार यांच्या खांद्यावर पक्षाची धुरा असणार आहे.
आज मंत्री म्हणून पद आणि गोपनीयतेची दिली जाणार शपथ
दरम्यान, सुनेत्रा पवारांचा शपथविधी आज सायंकाळी 5 वाजता होणार आहे. सायंकाळी 5 ते 5 वाजून 12 मिनिटांपर्यंत हा शपथविधी सोहळा चालणार आहे. यावेळी मंत्री म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ दिली जाणार आहे. तर अतिरिक्त पदभार असलेले राज्यपाल आचार्य देवव्रत हे यावेळी शपथ देणार आहे. सोबतच आज फक्त सुनेत्रा पवारांचाच शपथविधीसोहळा होणार आहे.
सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्रिपदासोबत कोणती खाती मिळणार?
अजित पवारांकडे उपमुख्यमंत्रिपदासोबतच अर्थ आणि इतर महत्वाचे खातेही होते. पण उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अर्थ खाते वगळता इतर खात्याची जबाबदारी सुनेत्रा पवार यांच्याकडेच राहणार आहे. सुनेत्रा पवार यांच्याकडे राज्य उत्पादन शुल्क आणि क्रीडा विभागाची जबाबदारी कायम राहणार आहे. अर्थसंकल्प अधिवेशनानंतर कदाचित अर्थ खात्याची जबाबदारी पुन्हा सुनेत्रा पवार यांना मिळू शकते. आज केवळ उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार शपथ घेतील. इतर कुणाचा ही शपथविधी नसणार आहे.
