Sunetra Pawar DCM Oath : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या विमान अपघातातील अकाली निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) या राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी विराजमान होणार आहेत. सुनेत्रा पवार आज (31 जानेवारी) उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. आज संध्याकाळी 5 वाजता सुनेत्रा पवारांचा (Sunetra Pawar DCM Oath) शपथविधी होणार आहे. त्या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री असतील. थोड्याच वेळात सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. आमदार, खासदार, मंत्री लोकभवनमध्ये येण्यास सुरुवात झाली आहे.
शपथविधी सोहळ्यासाठी कोण कोण लोकभवनमध्ये दाखल?
आज बरोबर 5 वाजता सुनेत्रा पवार या राज्याच्या उपमुख्यमंत्री म्हणून शपत घेणार आहेत. या सोहळ्यासाठी आमदार मंत्री लोकभवनमध्ये दाखल झाले आहेत. राष्ट्रवादीचे नेत आणि खासदार प्रफुल्ल पटेल, खासदार सुनील तटकरे, मंत्री छगन भुजबळ, मंत्री हसन मुश्रीफ, मंत्री नरहरी झिरवाळ, मंत्री इंद्रनील नाईक, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री आशिष शेलार हे सर्व मंत्री लोकभवनमध्ये दाखल झाले आहेत. तसेच पक्षाचे प्रमुख पदाधिकारी देखील लोकभवनमध्ये दाखल झाले आहेत. त्याचबरोबर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त देशमुख, माजी मंत्री धनंजय मुंडे,आमदार विक्रम काळे लोकभवनमध्ये पोहोचले आहेत. तसेच अमदार संजय खोडके, अनिल पाटील, हिरामण खोसकर शपथविधी सोहळ्यासाठी पोहचले आहेत.
सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादीच्या विधिमंडळ गटनेतेपदी एकमताने निवड
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा गटनेते पदासाठी सुनेत्रा पवार यांच्या नावाचा प्रस्ताव पक्षाचे नेते दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी मांडलाय. तर या प्रस्तावाला पक्षाचे जेष्ठ नेते म्हणून मंत्री छगन भुजबळ यांनी अनुमोदन दिलंय. परिणामी, सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादीच्या विधिमंडळ गटनेतेपदी एकमताने निवड झाली आहे. आता सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहे. त्यामुळे अजित पवारांच्यानंतर इथून पुढे सुनेत्रा पवार यांच्या खांद्यावर पक्षाची धुरा असणार आहे.
आज फक्त सुनेत्रा पवारांचाच शपथविधी सोहळा होणार
दरम्यान, सुनेत्रा पवारांचा शपथविधी आज सायंकाळी 5 वाजता होणार आहे. सायंकाळी 5 ते 5 वाजून 12 मिनिटांपर्यंत हा शपथविधी सोहळा चालणार आहे. यावेळी मंत्री म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ दिली जाणार आहे. तर अतिरिक्त पदभार असलेले राज्यपाल आचार्य देवव्रत हे यावेळी शपथ देणार आहे. सोबतच आज फक्त सुनेत्रा पवारांचाच शपथविधी सोहळा होणार आहे.