Master Chef Season 5: हिंदी टेलिव्हिजनवरील सर्वाधिक लोकप्रिय कुकिंग रिअॅलिटी शो ‘मास्टरशेफ ऑफ इंडिया’ पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पहिल्याच सीझनपासून या शोने प्रचंड लोकप्रियता मिळवली होती. सामान्य लोकांना आपल्या स्वयंपाकातील कौशल्यांना व्यासपीठ मिळवून देणं हेच या शोचं खास वैशिष्ट्य आहे. आता ‘मास्टरशेफ ऑफ इंडिया’चा (Master Chef India 5) नवा सीझन लवकरच सुरू होत असून, यंदा तो आणखी खास ठरणार आहे. या सीझनमध्ये परीक्षकांच्या भूमिकेत पुन्हा एकदा विकास खन्ना, रणवीर ब्रार आणि कुणाल कपूर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. शोचे काही प्रोमो सोशल मीडियावर समोर आले असून, त्यातील एक प्रोमो सध्या प्रचंड चर्चेत आहे.

Continues below advertisement

जोडीने स्वप्न पूर्ण करण्याचा प्रवास

यंदाच्या सीझनची खास बाब म्हणजे स्पर्धकांना जोडीने सहभाग घ्यावा लागणार आहे. याच सीझनमध्ये महाराष्ट्राची कन्या, मराठी इन्फ्लुएन्सर अर्चना धोत्रे ‘मास्टरशेफ ऑफ इंडिया’च्या मंचावर पोहोचली आहे. घरोघरी जाऊन टिफिन आणि जेवण बनवून कुटुंब चालवणाऱ्या अर्चनाने आपल्या मेहनतीचा आणि स्वयंपाकावरील प्रेमाचा प्रवास या मंचावर आणला आहे. तिच्यासोबत तिची पार्टनर रुपाली हीदेखील स्पर्धेत सहभागी झाली आहे.

परीक्षकही झाले थक्क 

प्रोमोमध्ये अर्चनाचं कुकिंग टॅलेंट पाहून परीक्षकही थक्क झाल्याचं पाहायला मिळतं. कुणाल कपूरने अर्चनाला “तू कोणकोणते पदार्थ बनवतेस?” असा प्रश्न विचारताच, अर्चनाने इंडियन, चायनीज, स्पॅनिश अशा विविध पदार्थांची यादी सहजपणे सांगितली. तिचा आत्मविश्वास आणि अनुभव पाहून परीक्षक भारावून गेले. यावेळी विकास खन्नाने अर्चनाचं मनापासून कौतुक करत म्हटलं, “अन्नाबाबत कोणाच्याही डोळ्यांत मी एवढं प्रेम याआधी कधीच पाहिलेलं नाही.” 

Continues below advertisement

स्वयंपाकातून उभं केलेलं जग

अर्चना या एका सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या महिला आहेत. घराघरांत जाऊन टिफिन आणि जेवण बनवणं हेच त्यांचं रोजचं जगणं आहे. या प्रवासाचे छोटे-छोटे व्लॉग त्या सोशल मीडियावर शेअर करत असतात. तसेच आपल्या खास रेसिपीज त्या युट्यूब चॅनेलवरही शेअर करतात. आज त्यांना इन्स्टाग्रामवर 10.8 हजारांहून अधिक फॉलोअर्स, तर युट्यूबवर 1.57 हजार सबस्क्राइबर्स आहेत.

नवा सीझन कधीपासून सुरू होणार?

मेहनत, स्वप्नं आणि स्वयंपाकावरील निस्सीम प्रेम यांची गोष्ट सांगणारा ‘मास्टरशेफ ऑफ इंडिया’चा नवा सीझन 5 जानेवारीपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अर्चना धोत्रेसारख्या सामान्य घरातील महिलांचा हा असामान्य प्रवास पाहणं, नक्कीच अनेकांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.