Akshay Khanna Drishyam 3: आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ सिनेमाच्या प्रचंड यशानंतर अभिनेता अक्षय खन्ना (Akshay Khanna) पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. बॉक्स ऑफिसवर धुरंधरनं धुमाकूळ घातल्यानंतर आता एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. अक्षय खन्नानं सुपरहिट फ्रेंचायझी ‘दृश्यम 3’ (Drishyam 3) मधून काढता पाय घेतल्याची चर्चा आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
‘धुरंधर’मध्ये अक्षय खन्नाचा स्वॅग प्रेक्षकांनी अक्षरशः उचलून धरला. दमदार डायलॉग्स असोत वा त्याची स्क्रीन प्रेझेन्स प्रत्येक सीनमध्ये अक्षय छाप सोडतो. सिनेमाच्या यशानंतर इंडस्ट्रीत त्याची डिमांडही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पण याच दरम्यान त्याच्या ‘दृश्यम 3’ संदर्भातील अक्षयच्या बातम्यांनी चाहत्यांना धक्का दिला आहे.
अक्षयनं खरंच ‘दृश्यम 3’ सोडला?
अक्षय खन्नानं अजय देवगणच्या ‘दृश्यम 3’ मधून वॉकआउट केल्याचं सांगितलं जात आहे. बॉलिवूड मशीनच्या रिपोर्टनुसार, फी वाढ आणि क्रिएटिव्ह मतभेद ही यामागची प्रमुख कारणं सांगितली जात आहेत. ‘धुरंधर’च्या मोठ्या यशानंतर अक्षयनं आपल्या मानधनात लक्षणीय वाढीची मागणी केल्याचं म्हटलं जातंय. इतकंच नाही तर, ‘दृश्यम 3’मध्ये आपल्या ऑनस्क्रीन लुकमध्ये मोठे बदल करण्याचीही त्याची मागणी होती. या मागण्यांमुळे मेकर्स आणि अक्षय यांच्यात मतभेद झाले आणि त्यातूनच अभिनेत्यानं सिनेमातून माघार घेण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे.
मात्र, सूत्रांच्या माहितीनुसार अक्षय खन्ना आणि मेकर्स यांच्यात चर्चा अजूनही सुरू आहे. अभिनेता चित्रपटातून बाहेर पडल्याची कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. त्यामुळे चाहत्यांना अजूनही ‘दृश्यम 3’मध्ये अक्षय खन्नाला पाहण्याची आशा आहे. ‘धुरंधर’नंतर त्याची वाढलेली लोकप्रियता पाहता, त्याला गमावणं मेकर्ससाठी तोट्याचं ठरू शकतं. दरम्यान, ‘दृश्यम 3’ची पहिली झलक नुकतीच समोर आली असून हा सिनेमा पुढील वर्षी 2 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे.
‘धुरंधर’ची बॉक्स ऑफिस कमाई
‘धुरंधर’नं रिलीजनंतर अवघ्या 19 दिवसांत 590 कोटी रुपयांचा गल्ला कमावलाय. लवकरच 600 कोटींचा टप्पा गाठण्याची शक्यता आहे. आदित्य धर यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या या चित्रपटात अक्षय खन्नासह संजय दत्त, राकेश बेदी, रणवीर सिंह आणि सारा अर्जुन महत्त्वाच्या भूमिकेत दिसले. धुरंधरनंतर अक्षय कोणत्या नव्या भूमिकेत दिसणार याकडे प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते.
यातच दृश्यम 3 चित्रपटाची घोषणा झाली. मूळ मल्याळम कथेत नसलेला अक्षय खन्नाचा आयजी ऑफिसरचा रोल हिंदी रिमेकमध्ये टाकण्यात आला होता आणि हाच बदल ‘दृष्यम 2’ची सर्वात मोठी ताकद ठरला. दुसऱ्या भागात क्लायमॅक्समधील घडामोडी इतक्या अनपेक्षित आहेत की प्रेक्षकांनी बांधलेले सगळे अंदाज कोलमडून पडतात. पण आता तिसऱ्या भागातही अक्षय खन्ना दिसणार का? हे अजून गुलदस्त्यातच आहे. धुरंधरच्या यशानंतर अक्षय खन्नाच्या पात्राकडे चाहत्यांचे विशेष लक्ष राहणार आहे.