Masaledar Kitchen Kallakar : झी मराठी वाहिनीवरील ‘किचन कल्लाकार’ हा कुकरी शो प्रेक्षकांच्या पसंतीस पडला आहे. आता ‘किचन कल्लाकार’चं दुसरं पर्व प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या पर्वाचं नाव ‘मसालेदार किचन कल्लाकार’ (Masaledar Kitchen Kallakar ) असं आहे. यावेळेस या कार्यक्रमात झणझणीत मराठी तडका देखील दिसतो आहे. त्यामुळे या नवीन तडक्यात काय काय पाहायला मिळणार यासाठी प्रेक्षक देखील उत्सुक आहेत. ‘मसालेदार किचन कल्लाकार’च्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या भागात मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar), भाजपच्या उपाध्यक्ष चित्रा वाघ (Chitra Wagh) आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे-पाटील (Rupali Patil) यांनी सहभाग घेतला होता.


आता एकाच मंचावर जेव्हा इतक्या दिग्गज राजकारणी एकत्र जमणार, तेव्हा कल्ला तर होणारच! यावेळी चटपटीत पदार्थांसोबत अनेक गोष्टी आणि किस्से देखील ऐकायला मिळाले. इतकंच नव्हे, तर या दरम्यान एक गंमतीशीर टास्क देखील झाला, ज्यात महापौर किशोरी पेडणेकर यांना अनेक दिग्गज नेत्यांची आठवण आली.


किशोरीताईंनी गोष्टींना दिली नेत्यांची नावं!


मंचावर एक खास टास्क आयोजित केला गेला होता. या टास्कमध्ये एक बॉक्स आणण्यात आला, ज्यात अनेक पदार्थ आणि वस्तू होत्या. टास्कनुसार किशोरी पेडणेकर यांना हे पदार्थ किंवा वस्तू पाहून कोणत्या नेत्याची आठवण आली, त्यांचे नाव घ्यायचे होते. यात पहिला पदार्थ होता ‘जिलेबी’. ‘जिलेबी पाहून किशोरी पेडणेकर यांना भाजप नेते आमदार गिरीश महाजन यांची आठवण आली. यर, सुरी बाहेर येताच किशोरीताईंनी चटकन शिवसेना नेते संजय राऊत यांचं नाव घेतलं. यानंतर बॉक्समधून निघाला भोंगा. आता भोंगा पाहिल्यावर कुणाची आठवण येते म्हटल्यावर त्यांनी तडक भाजप नेते किरीट सोमय्या यांचं नाव घेतलं आणि संपूर्ण सेटवर हास्यकल्लोळ झाला.



भोंग्याने जाग येते सगळ्यांना!


भोंग्यासाठी किरीट सोमय्यांचं नाव घेतल्यानंतर पाठीमागे उभ्या असणाऱ्या भाजपच्या उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी देखील किशोरी पेडणेकरांना कोपरखळी मारली. ‘भोंग्याने जाग येते सगळ्यांना.. झोपू शकत नाही कुणी’, असं चित्रा वाघ यावेळी म्हणाल्या.


या खास भागात किशोर पेडणेकरांना खास सरप्राईज देखील मिळालं. या भागात त्यांच्या पतींनी देखील हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी लग्नाच्या सुरुवातीच्या दिवसांचे आणि प्रेमात असतानाचे भन्नाट किस्से देखील प्रेक्षकांसोबत शेअर केले.



हेही वाचा :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha