Marathi Actor In Riteish Deshmukhs Raja Shivaji Movie: काही महिन्यांपूर्वी रिलीज झालेल्या 'छावा' सिनेमानं (Chhaava Movie) बॉक्स ऑफिसवर (Box Office) दणाणून सोडलं. 'छावा'ला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादानंतर एकंदरीतच ऐतिहासिक सिनेमांची क्रेझ वाढल्याचं पाहायला मिळालं. अशातच येत्या काळात दर्जेदार सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीसाठी येत आहेत. त्यापैकी एक म्हणजे, रितेश देशमुख (Riteish Deshmukh) अभिनीत, दिग्दर्शित 'राजा शिवाजी' (Raja Shivaji Movie). या सिनेमाकडे केवळ महाराष्ट्राचंच नाहीतर, संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) सध्या शिवचरित्रावर आधारित राजा शिवाजी हा सिनेमा करतोय. विशेष म्हणजे या सिनेमाचं दिग्दर्शन देखील तो स्वत:च करत आहे.
रितेश देशमुखनं 'राजा शिवाजी' सिनेमाची घोषणा केल्यापासूनच प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचलेली. या सिनेमात रितेश स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे. तसेच, इतरही अनेक कलाकार झळकणार आहेत. अशातच, आता रितेश देशमुखच्या आगामी सिनेमात मराठी मालिकाविश्वातील एका सुप्रसिद्ध अभिनेत्याची वर्णी लागली आहे. याबाबत स्वतः अभिनेत्यानं सोशल मीडियावर पोस्ट करुन माहिती दिली आहे.
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' सिनेमात मराठी मालिकाविश्वातील सुप्रसिद्ध अभिनेता कपिल होनराव झळकणार आहे. कपिलनं आजवर अनेक मालिकांमधून आपल्या अभिनयाचं दर्शन प्रेक्षकांना दिलं आहे. पण त्याला खरी प्रसिद्धी मिळाली, ती 'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेतून. अशातच आता थेट रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' सिनेमाची ऑफर मिळाल्यामुळे अभिनेत्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे.
कपिल होनरावनं पोस्टमध्ये काय म्हटलंय?
मराठी अभिनेता कपिल होनराव यानं सोशल मीडियावर पोस्ट करुन चाहत्यांसोबत आनंदाची बातमी शेअर केली. अभिनेत्यानं पोस्टमध्ये म्हटलंय की, "2024 हे वर्ष माझ्यासाठी थोडं कठीण वर्ष होतं. घटस्थापनेच्या पहिल्या दिवशी आईला मनोभावे प्राथना केली होती की, पुढील नवरात्रीपर्यंत काही तरी मोठ होऊ दे आणि ज्यांना पाहून मी ह्या इंडस्ट्रीमध्ये आलो, माझे आदर्श अशा रितेश विलासराव देशमुख यांच्या #राजाशिवाजी ह्या चित्रपटाचा मी भाग झालो..."
"रोहन मापुसकर या मराठीमधल्या सगळ्यात मोठ्या कास्टिंग डिरेक्टरनं माझं या सिनेमासाठी कास्टिंग केलं. आणि शिवाजी महाराजांच्या स्वराज्य निर्मितीमध्ये महाराजांसोबत बालपणापासून ज्यांनी योगदान दिलं अशा मावळ्याची भूमिका मला करायला मिळते आहे. आज तुमच्या सोबत हे क्लॅप शेयर करतोय... घटस्थापनेचा हा दिवस व आज पासून सुरू होणारी नवरात्र आपल्या जीवनात नवचैतन्य, सुख शांती व प्रेमाची वृद्धी करो हीच आमच कामना. आपणास नवरात्रीच्या हार्दिक शुभकामना..!", असं कपिल होनरावनं पोस्टमध्ये म्हटलं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :