Rajshree Landgey On Marathi Film Industry: मराठी सिनेसृष्टीत (Marathi Film Industry) आजवर झालेले काही सिनेमे कायम लक्षात राहिलेत, त्यापैकीच एक म्हणजे, 'गाढवाचं लग्न' (Gadhwacha Lagna). 'गाढवाचं लग्न' असा हा एक मराठी चित्रपट (Marathi Movie) ज्यानं प्रेक्षकांचं खूप मनोरंजन केलं. आजही हा सिनेमा टीव्हीवर लागला तरी प्रेक्षक आवडीनं पाहतात आणि लोटपोट होऊन हसतातही. या सिनेमात सावळ्या कुंभाराची भूमिका मकरंद अनासपुरे यांनी साकारलेली. तर, सावळ्या कुंभाराची पत्नी गंगी ही भूमिका मराठमोळी अभिनेत्री राजश्री लांडगे (Rajshree Landgey) हिनं साकारलेली. पण, 'गाढवाचं लग्न'मधून नावारुपाला आलेली अभिनेत्री राजश्री लांडगे सध्या मात्र रुपेरी पडद्यापासून दूर असल्याचं पाहायला मिळतंय. मग राजश्री नेमकं करते काय? तिनं त्यानंतर कोणताही सिनेमा का नाही केला? यावर एका मुलाखतीत बोलताना तिनं स्पष्ट मत मांडलं आहे.
अभिनेत्री राजश्री लांडगे हिला राजकीय पार्श्वभूमी लाभलीय. अभिनेत्रीचे आजोबा कर्मवीर मारुतीराव लांडगे म्हणजे, राजकारणातलं मोठं नाव. तर, अभिनेत्रीचे वडील सध्या पाटबंधारे खात्यात सचिव आहेत. अशातच अभिनेत्री सध्या इंडस्ट्रीतून गायब असून सध्या ती समाजकारण, राजकारणात सक्रीय आहे. पण, 'गाढवाचं लग्न'नंतर राजश्री दुसऱ्या कुठल्या सिनेमात का दिसली नाही? यावर अभिनेत्रीनं स्वतः भाष्य केलं आहे.
राजश्री लांडगे नेमकं काय म्हणाली?
फिल्मी मराठीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना राजश्री लांडगे म्हणाली की, "मराठी सिनेइंडस्ट्रीतील ग्रुपने मला कायम बाजूला ढकललं. 'तुम्ही काय बाबा राजकीय, तुमच्याकडे जमिनी, शेती असेल... इथे आम्हाला काम करू दे, तुमचं काय?' मग हे तुम्ही रितेश देशमुखला म्हणू शकता का असं? तो माझ्याच समाजाचा आहे, 3 वेळा मुख्यमंत्री राहिलेल्याचा मुलगा. रितेशपेक्षा या इंडस्ट्रीत असं कोण मोठं आहे? कोण आहे मोठं... आम्हाला त्याचं प्रचंड भूषण आहे, कशाला लाज वाटली पाहिजे? तुम्ही त्यांना सांगू शकता का? 'तुमच्याकडे सगळंच आहे, तुम्ही कशाला इंडस्ट्रीत काम करता...?' त्यांचं बॅकग्राउंड कितीही मोठं असू दे. शेवटी त्यांचं वागणं, काम करणं यामुळेच ते लोकप्रिय आहेत ना...?"
"बॉलिवूडमध्ये ते फक्त मुख्यमंत्र्यांचा मुलगा म्हणून प्रसिद्ध आहेत का? त्यांचं चांगलं वागणं,चांगलं काम करणं हे तुम्ही काढून नाही घेऊ शकत. तसंच मी साकारलेली 'गंगी' भावली नसती, केवळ माझ्या बॅकग्राउंडमुळे मी गाजू शकले असते का? हे सगळं खोटं आहे, हा ज्याचा त्याचा स्ट्रगल आहे, तुम्ही कामावर बोला. कॅमेऱ्याला माहीत नाही की राजश्री लांडगे कोणाची मुलगी आहे, कॅमेऱ्याला दिसत नाही की रितेश देशमुख कोणाची व्यक्ती आहे त्याला फक्त अभिनय दिसतो आणि ती भूमिका दिसते.", असं राजश्री लांडगे म्हणाली.
महत्त्वाच्या इतर बातम्या :