Marathi actor Vivek Sangle Instagram account suspended issue: मराठी कलाकार विवेक सांगळेनं मालिका विश्वात बरीच प्रसिद्धी मिळवली. स्टार प्रवाहवरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेतून तो घराघरात पोहोचला. या आधी भाग्य दिले तू मला या लोकप्रिय मालिकेमुळे तो प्रकाशझोतात आला. त्याचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. विवेकचे पोस्ट सोशल मीडियात व्हायरल होतात.  दरम्यान, तो एका अडचणीत सापडला आहे. त्याचं व्हेरिफाईड इन्स्टाग्राम अकाउंट अचानक बंद झाले आहे. अकाउंट बंद झाल्यानंतर त्यानं प्लॅटफॉर्मने सांगितलेली अपील प्रक्रिया पूर्ण केली.  तरी देखील अद्याप त्याचे अकाउंट सुरु झाले नाही. त्यानं नवीन अकाउंट सुरु करुन चाहत्यांना याबाबत माहिती दिली.

इन्स्टाग्राम अकाउंट बंद होण्यापू्र्वी विवेकला 1.42 लाखांहून अधिक नेटकरी फॉलो करत होते.  त्याच्या अनेक रील्सना लाखो आणि कोट्यवधी व्ह्यूज मिळत होते. त्यापैकी काही व्हिडिओंना 32 दशलक्षांहून अधिक व्ह्यूज मिळाले होते. दरम्यान, त्याचं अकाउंट अचानक बंद झाले. गेल्या 65 दिवसांपासून त्याचं अकाउंट बंद झाले असल्याची माहिती समोर आली आहे.

आजच्या काळात कलाकारांसाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म हे केवळ फॅन्सशी संवाद साधण्याचे माध्यम नाही तर, प्रोजेक्ट प्रमोशन, ब्रँड कोलॅबोरेशन आणि डिजिटल ओळख यासाठी महत्त्वाचे साधन बनले आहे. त्यामुळे व्हेरिफाईड अकाउंट अचानक बंद झाल्यास कलाकारांच्या डिजिटल उपस्थितीवर तसेच व्यावसायिक संधींवरही परिणाम होऊ शकतो.

या घटनेबाबत विवेक म्हणाला, 'त्याच्या अकाउंटवरील ज्या कंटेंटबाबत आक्षेप नोंदवला गेला होता, त्याबाबत संबंधित ब्रॉडकास्टरने लेखी स्पष्ट केले की ते ऑटोमेटेड मॅचेस होते.  कोणतीही मॅन्युअल कॉपीराइट तक्रार दाखल करण्यात आलेली नव्हती. हे स्पष्टीकरण त्यांनी इंस्टाग्रामच्या सपोर्ट सिस्टीमला पाठवून नव्या मॅन्युअल रिव्ह्यूची विनंती केली आहे. अकाउंट बंद झाल्यानंतर इंस्टाग्रामने सांगितलेली सर्व नियमित प्रक्रिया पूर्ण केली आहे. मेटाच्या मुंबईतील टीमला तसेच अमेरिकेतील सपोर्ट चॅनेललाही ईमेल पाठवण्यात आले आहे, अद्याप कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही', असंही अभिनेत्यानं स्पष्ट केलं. 

 

दरम्यान, विवेकनं संपूर्ण प्रकरणात प्लॅटफॉर्मच्या प्रक्रियेचा आदर असल्याचं स्पष्ट केलं आहे. चाहत्यांशी संपर्क कायम ठेवण्यासाठी विवेकनं नवे इन्स्टाग्राम अकाउंट सुरु केले आहे. तसेच त्यानं या नव्या अकाउंटमधून याची माहिती दिली. यासह चाहत्यांना फॉलो करण्याचे आवाहनही केलं आहे.  त्याचं अकाउंट अद्याप  बंद असले तरी,  चाहत्याशी संवाद कायम ठेवण्याचा प्रयत्न तो नव्या अकाउंटवरुन करत आहे.