LPG Gas Shortage: इराण-इस्रायल संघर्षाचे पडसाद आता भारतातही उमटू लागले असून त्याचा थेट परिणाम एलपीजी (LPG) पुरवठ्यावर होताना दिसत आहे. केंद्र सरकारने (Central Government) खबरदारीचा उपाय म्हणून व्यावसायिक वापरासाठीच्या एलपीजी सिलेंडरचा पुरवठा तात्पुरता थांबवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. या निर्णयामुळे देशभरातील हॉटेल, रेस्टॉरंट आणि फूड इंडस्ट्रीसमोर मोठे संकट निर्माण झाले असून पुढील काही दिवसांत हा उद्योग ठप्प होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अशातच अनेक शहरांमध्ये गॅस सिलेंडर घेण्यासाठी मोठ-मोठ्या रांगा लावल्या आहेत, अशातच पुण्यातही शिवाजीनगर भागातील गॅस एजन्सीच्या समोर नागरिकांनी गर्दी केली आहे.(Pune Gas Cylinder)
घरगुती गॅसचा पुरवठा सुरळीत असल्याचं पुरवठा विभागाकडून सांगितलं जात असलं तरी गॅस एजन्सीच्या समोर लोकांची गर्दी पाहायला मिळत आहे. कारण नेहमीप्रमाणे मोबाईलच्या माध्यमातून गॅस सिलेंडर बुक करण्याचा प्रयत्न केला असता तो होत नाहीये असं लोकांचं म्हणणं आहे. त्याचबरोबर गॅस बुक होऊन अनेक दिवस झाल्यानंतर देखील गॅस घरी आला नसल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे.(Pune Gas Cylinder)
तर शिक्षणासाठी पुण्यात राहणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. नोकरी करणारे बॅचलर देखील पुण्यात मोठ्या प्रमाणात आहेत. या सगळ्यांना जेवणासाठी आधार असतो तो खानावळींचा. मात्र गॅसच्या तुटवड्यामुळे या खानावळी बंद पडू लागल्यात. आज संध्याकाळपर्यंत पुरेल इतकाच गॅस उरल्याने अनेक विद्यार्थ्यांचे पैसे परत करावे लागत असल्याच खानावळी मालकांचं म्हणणं आहे.
मिठाईच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता
व्यवसायिक वापराच्या गॅस सिलेंडरच्या किमतीत वाढ झाल्यानं मिठाईच्या किमतीत वाढ करावी लागेल असं मिठाईच्या दुकानदारांचं म्हणणं आहे. पुण्यातील काका हलवाई मिठाई गॅसचा पुरवठा पुरेसा होत नसल्यानं मिठाईचे दुकानदार डिझेल किंवा इलेक्ट्रिक शेगड्यांचा पर्याय अवलंबत असले तरी गॅसचा पुरवठा पुरेसा होत नसल्याचा परिणाम व्यवसायावर होऊ लागल्याचं पुण्यातील काका हलवाई मिठाई दुकानाचे मालक युवराज गाढवे यांनी म्हटलं आहे.
सोलापुरातील प्रसिद्ध उपहारगृहात 1-2 दिवस पुरेल इतकाच गॅससाठा
इंधन तूटवड्यामुळे सोलापुरातील प्रसिद्ध सुधा उपहारगृहात केवळ 1-2 दिवस पुरेल इतकाच गॅससाठा उपलब्ध आहे. सुधा उपहार गृहच्या सोलापुरात तीन शाखा असून तिन्ही शाखात हीच परिस्थिती आहे. जर आज आणि उद्यात गॅसचा पुरवठा झाला नाही तर एक एक करून हॉटेल बंद करण्याशिवाय पर्याय नसल्याचे मतं हॉटेल व्यवसायिक व्यक्त करत आहेत. कोरोना काळात ज्या पद्धतीने गॅसच्या पुरवठ्याची परिस्थिती निर्माण झाली होती, तीच स्थिती आता पाहायला मिळतेय, अशी भावना सुधा उपहार ग्रहाचे मालक रोहन किणगी यांनी व्यक्त केली आहे.
घरगुती गॅस धारकांना कंपनीने पाठवले मेसेज
घरगुती गॅस धारकांना हे मेसेज (sms) येत आहेत की, "प्रिय ग्राहक, सोशल मीडिया पर ईंधन की कमी को लेकर फैलाए जा रहे दावे भ्रामक और निराधार हैं। देश में ईंधन की पर्याप्त उपलब्धता है। नागरिकों को आश्वस्त किया जाता है कि किसी भी प्रकार की चिंता करने की आवश्यकता नहीं है। ईंधन का समझदारी से उपयोग करना हमेशा लाभदायक होता है। -HPCL
ठाणे महानगरपालिका हद्दीत गॅस सिलेंडरचा तुटवडा
ठाणे महानगरपालिका हद्दीतील कळवा परिसरात गॅस सिलेंडरचा तुटवडा जाणवू लागला असून यामागे आखाती राष्ट्रांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम असल्याची माहिती समोर येत आहे. कळवा शहरात सुमारे ४५ हजार घरांमध्ये एचपी गॅसचा पुरवठा केला जातो. मात्र सध्या मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी होत असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.मिळालेल्या माहितीनुसार कळवा शहरात दररोज सुमारे दीड हजार ते दोन हजार एचपी गॅस सिलेंडरची मागणी असते. मात्र सध्या केवळ सुमारे ९०० सिलेंडरच उपलब्ध होत असल्याने उर्वरित ग्राहकांना प्रतीक्षा करावी लागत आहे. परिणामी अनेक नागरिक थेट गोडाऊनमध्ये जाऊन चौकशी करत असून काही ठिकाणी संतप्त ग्राहकांकडून वादविवादाचे प्रकारही घडत आहेत. गॅस एजन्सीच्या कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या पुरवठा साखळीवर परिणाम झाल्याने सिलेंडर उपलब्धतेत घट झाली आहे. त्यामुळे परिस्थिती सुरळीत होईपर्यंत नागरिकांनी संयम बाळगण्याचे आवाहनही करण्यात येत आहे.दरम्यान, आखाती राष्ट्रांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम पुढील काळात अधिक जाणवण्याची शक्यता व्यक्त केली जात असून ठाणे महानगरपालिका हद्दीत गॅस सिलेंडरच्या पुरवठ्यावर त्याचा मोठ्या प्रमाणात परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीचा अकोल्यातील हॉटेल व्यवसायिकांना फटका
व्यावसायिक वापराच्या सिलेंडर तुटवड्यामुळे अकोल्यातील हॉटेल व्यवसाय बंद पडण्याच्या मार्गावर. अमेरिका आणि आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीचा अकोल्यातील हॉटेल व्यवसायिकांनाही चांगलाच फटका बसला आहे. व्यावसायिक वापराच्या सिलेंडरचा पुरवठा कमी होत असल्यामुळे अकोल्यातील हॉटेल व्यवसायिक चांगलेच अडचणीत आले आहेत. अशीच परिस्थिती कायम राहिली तर पुढच्या दोन दिवसानंतर अकोल्यातील हॉटेल व्यवसाय बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. अकोल्यात 400 च्या वर मध्यम आणि मोठे हॉटेल, स्वीट मार्ट, कॅटरिंग आणि रेस्टॉरंट आहेत. या ठिकाणी दररोज जवळपास 400 सिलेंडरची आवश्यकता आहेय. मात्र, सध्या व्यावसायिक सिलेंडरचा पुरवठाच बंद असल्याने हॉटेल व्यवसायिकांसमोर व्यवसाय सुरू ठेवण्याचा मोठा प्रश्न पडलाय. यावर उपाय म्हणून काही हॉटेल व्यवसायिकांनी आता इलेक्ट्रिक इंडक्शन शेगड्यांना प्राधान्य दिलं आहे.
