Actor Vidyadhar Joshi On Nagpur Violence: राज्याची उपराजधानी नागपूरमध्ये (Nagpur News) सोमवारी रात्री अचानक दोन गटांत तणाव निर्माण झाला. त्यानंतर नागपुरात कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाली. अचानक झालेल्या दंगसदृश्य परिस्थितीमुळे संपूर्ण जिल्ह्यासह राज्यभरात तणावाचं वातावरण होतं. शहरातील महाल भागात संतप्त जमावानं केलेल्या समाजविघातकी कृत्यामुळे मोठी वित्तहानी झाली. तर दगडफेक आणि जाळपोळीच्या घटनेमुळे अनेकांचे मोठे नुकसान झालं आहे. या घटनेत अनेक पोलीस कर्मचारी जखमी झाल्याचीही माहिती मिळत आहे. परिणामी कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांकडून काल (17 मार्च) उशीरापर्यंत कसोशीनं प्रयत्न करत परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं. तसेच, तर रात्रभरात जवळ जवळ 80 दंगलखोरांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. अशातच या घटनेनंतर संपूर्ण राज्यातील वातावरण ढवळून निघालं आहे. याचसंदर्भात एका मराठी अभिनेत्यानं परखड पोस्ट करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
अभिनेते विद्याधर जोशी (Vidyadhar Joshi) म्हणजेच, बाप्पा यांनी एक फेसबुक पोस्ट केली आहे. त्यांच्या पोस्टवर अनेकजण सकारात्मक प्रतिसाद देत आहेत. विद्याधर जोशींनी एकप्रकारे आपल्या पोस्टमधून कानउघडणी करण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच, अनेकांना जाबही विचारला आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात सुरू असलेला औरंगजेबाच्या कबरीचा वाद आणि नागपुरातील राडा या प्रकरणावर विद्याधर जोशींनी फेसबुक पोस्ट केली आहे.
फेसबुक पोस्टमध्ये विद्याधर जोशींनी नेमकं काय म्हटलंय?
अभिनेते विद्याधर जोशी यांनी फेसबुक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलंय की, "नागपुरात दोन गटात दंगल!! जे पेराल तेच उगवत!! गाडला होता ना एवढे वर्ष त्याला. जमिनीत झोपला होता तो.काही फरक पडला होता?? ढोसून ढोसून उकरून बाहेर काढलंत त्याला. आता त्याचं भूत तुमच्या खांद्यावरती बसून खादाखदा हसेल आणि त्या भुताला ताकद, बळ कोण देतय तर ज्यांची शिवराय, संभाजी आणि जिजाऊ यांची नाव मनात आणण्याची सुद्धा लायकी नाही असे राजकीय पुढारी!!"
"खरी खोटी बातमी पसरली की लगेच उतरले सगळे गट राडे करायला!! इतके भ्रष्टाचारी, बलात्कारी, खुनी औरंगजेब आजुबाजूला आहेत, त्यांचे पुतळे यांना कधी जाळावे असे वाटत नाही. त्यांना कबरीत गाडाव, त्यांच्या आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या लोकांविरुद्ध आंदोलन करावं असं वाटत नाही आणि निघाले so called धर्माभिमानाचा झेंडा खांद्यावर घेऊन. अर्थात ह्यांनी भडकवल्यावर आपण भडकणारी मूर्ख जनता ही कारणीभूत आहोत त्याला !!", असंही विद्याधर जोशी फेसबुक पोस्टमध्ये म्हणाले आहेत.
विद्याधर जोशींच्या पोस्टवर नेटकरी काय म्हणाले?
अभिनेते विद्याधर जोशींच्या फेसबुक पोस्टवर युजर्सकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे. एका युजरनं लिहिलंय की, 'पुर्णपणे सहमत', आणखी एका युजरनं लिहिलंय की, 'जोशी साहेब काही नाही हो सरकारचा नाकर्तेपणा व सरकारमधील मंत्र्यांचे काळे कारनामे झाकण्यासाठी झालेला हा एक प्रयत्न म्हणावं लागेल आणि लगेच जनता देखील आक्रमक', एका युजरनं असंही लिहिलंय की, 'औरंग्या तर बहाणा आहे खर तर संतोष देशमुख प्रकरणं गुंडाळण्या साठी हे सगळं सुरू आहे हे न कळण्या इतपत तरी जनता मूर्ख नाही.असो महाराष्ट्रात जे सुरू ते बघून आता महाराष्ट्राचा यूपी बिहार होणार हे नक्की'
आज नागपुरात तणावपूर्ण शांतता
नागपूरमधील सोमवारच्या राड्यानंतर आज परिस्थिती नियंत्रणात असून सध्या तणावपूर्ण शांतता आहे. महाल भागात पोलिसांचा तगडा बंदोबस्त असून पोलिसांकडून रात्रभर कोम्बिंग ऑपरेशन करण्यात आलं आणि 80 जणांना अटक केली आहे. आक्षेपार्ह व्हिडीओ आणि मजकूर पसरवणारी 55 सोशल मीडिया अकाऊंट पोलिसांच्या रडारवर आहेत. कोतवाली, गणेशपेठ, लकडगंज, पाचपावली, शांतीनगर, सक्करदरा,नंदनवन, इमामवाडा,यशोधरानगर आणि कपिलनगर भागात संचारबंदी लागू करण्यात आलीय. नागपुरात औरंगजेबाच्या कबरीचा वाद विकोपाला पोहोचला. महाल परिसरात काही तरुणांनी दगडफेक करत जाळपोळ केली. दोन गटात झालेल्या या वादानंतर पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र दगडफेकीमुळे पोलिसांकडून अश्रूधुराच्या नळकांड्या वापरल्या. अफवांवर विश्वास ठेवू नका, शांतता राखा, असं आवाहन पोलिसांनी केलंय.