मुंबई: विनोदात निखळता आणि विनोदी संवादातील उत्स्फूर्तता कशी आणायची हे मी दादांकडे पाहून शिकलो, दादांनी जणू मला हा गुरूमंत्रच दिला होता अशा शब्दात अभिनेते अशोक सराफांनी दादा कोंडकेंच्या आठवणींना उजाळा दिला. दादा कोंडकेंच्या आठवणीत अशोक सराफ यावेळी काहीसे भावुकही झाले होते.
रंगभूमीवर किंवा मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांना जितकं रडवणं सोपं असतं तितकचं हसवणं कठीण असतं. म्हणजे अनेकदा पडद्यावर किंवा रंगमंचावर असा एखादा प्रसंग असतो की ज्यामध्ये विनोदी संवाद अगदी खुमासदार असतो, पण प्रेक्षकांना हसवण्यात मात्र तो नापास होतो. अशा वेळी त्याच्यासाठी महत्त्वाचं ठरतं ते विनोदाचं अचूक टायमिंग. हे टायमिंग अचूक साधणाऱ्यांच्या यादीमध्ये दादा कोंडकेंचं (Dada Kondke) नाव हे अगदी अव्वल स्थानी घेतलं जातं. एक काळ होता की दादा कोंडके यांनी हिंदी सिनेमा निर्मात्यांनाही घाम फोडला होता.
अभिनय, दिग्दर्शन, संवादलेखन, निर्माता अशा प्रत्येक भूमिकेत दादा कोंडके यांनी जादू केली होती. त्यामुळे बड्या निर्मात्यांनाही दादांच्या सिनेमापुढे आपल्या सिनेमाच्या तारखा पुढे ढकलाव्या लागल्या होत्या. दादा कोंडकेंच्या सिनेमाची भुरळ आज जितकी पन्नाशीतल्या पिढीला आहे, तितकीच ती तरुण पिढीला देखील आहे. दादांच्या विनोदाचा हा वारसा खऱ्या अर्थाने पुढे नेला तो अशोक सराफांनी असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. दादांच्या 91 व्या वाढदिवसानिमित्त अशोक मामांनी त्यांच्या काही आठवणींना उजाळा दिला. विनोदाची पेरणी योग्य रित्या कशी करावी याचा मंत्र दादांनीच अशोकमामांना दिला होता.
नेमका काय आहे तो कानमंत्र?
दादा कोंडके यांनी अशोक सराफांना दिलेल्या त्या कानमंत्राबद्दल सांगताना अशोक मामा हे भावुक झाले होते. दादांना जशी विनोदाची नस सापडली होती तशीच नस अशोक सराफ यांनाही सापडल्याचं म्हटलं जातं. इतकचं नव्हे तर दादांच्या चाहत्यांच्या यादीमध्ये अशोक सराफ हे नाव प्रामुख्याने घेतलं जातं. यावर बोलताना अशोक सराफांनी म्हटलं की, “दादांचा विनोद कधीच ओढून ताणून नव्हता तर त्यामध्ये एक उत्स्फूर्तता होती. विनोदात निखळता आणि विनोदी संवादातील उत्स्फूर्तता कशी आणायची हे मी दादांकडे पाहून शिकलो. दादांनी जणू मला हा गुरूमंत्रच दिला होता. दादांच्या विनोदातील सहजता लोकांना इतकी भावली की दादांचा सिनेमा म्हणजे ज्युबिली स्टार हे समीकरणच झालं.”
‘पांडू हवालदार’ या चित्रपटाने अशोक सराफांच्या कारकीर्दीला कलाटणी मिळाली. ‘तुमचं आमचं जमलं’,‘पांडू हवालदार’ आणि ‘राम राम गंगाराम’ या तीन सिनेमात अशोक सराफांनी दादा कोंडकेंसोबत काम केलं. त्यांच्या या प्रवासाबद्दल सांगताना अशोक सराफांनी म्हटलं की, "दादांमध्ये खूप टॅंलंट होतं. दादा पडद्यावरच नव्हे तर व्यक्तीगत आयुष्यातही हजरजबाबी होते. बोलताना त्यांना सहज विनोद सुचत. मला त्यांच्यातील आवडणारी गोष्ट म्हणजे त्यांनी बहुतांश सिनेमे विनोदी ढंगातील करूनही त्यांचा विनोद प्रत्येकवेळी नवीनच वाटला. सिनेमाच्या स्क्रीप्टवर त्यांची पकड होती. त्यामुळे प्रत्येक सीन पडद्यावर कसा दिसणार हे त्यांना आधीच कळायचं.लेखक राजेश मुजूमदार यांच्या साथीने दादांनी प्रत्येक सिनेमात कमाल केली आहे. दादांची हीच कमाल आता झी टॉकीजमुळे पुन्हा अनुभवता येणार याचा मला आनंद आहे."
झी टॉकीज या वाहिनीवर सध्या दादा कोंडके यांच्या गाजलेल्या चित्रपटांची मेजवानी सध्या प्रेक्षकांना चाखायला मिळत आहे. दादा कोंडके यांचा 91 वा वाढदिवस 8 ऑगस्ट रोजी झाला. त्यानिमित्ताने 6 ऑगस्टपासून दर रविवारी दादांचे ज्युबिली स्टार चित्रपट झी टॉकीज वाहिनीवर दाखवण्यात आले. येत्या रविवारी 10 सप्टेंबर ला ज्यूबली स्टार सीजन ची सांगता 'आली अंगावर' ह्या चित्रपटाने होणार आहे.