मराठी सिनेसृष्टीतून एक दुख:द घटना समोर आली आहे. दिग्दर्शक आणि मराठी अभिनेता रणजीत पाटील यांचं निधन झालं आहे. वयाच्या 42 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्राथमिक माहितीनुसार, रणजीत पाटील यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले असल्याची माहिती आहे. गेल्या काही महिन्यांपासून त्यांना हृदयाच्या निगडीत समस्या होत्या. त्यांच्या निधनाची बातमी कळताच कलाकार, अभिनेते आणि दिग्दर्शकांना मोठा धक्का बसला आहे. तरूण वयात रणजीत पाटील यांचं निधन झाल्यामुळे मराठी मनोरंजन विश्वात शोककळा पसरलीये.
दिग्दर्शन तसेच अभिनय क्षेत्रातही उत्तम कामगिरी
गेल्या काही वर्षांपासून रणजीत पाटील हे मराठी मालिका, नाटक तसेच चित्रपट विश्वात सक्रीय होते. तसेच पाटील यांनी एकांकिका स्पर्धांमधून तरूण कलाकारांना प्रोत्साहन दिलं होतं. अभिनय तसेच दिग्दर्शन क्षेत्रात त्यांनी आपला वेगळा ठसा उमटवला. त्यांनी नंतर तरूण रंगकर्मींना मार्गदर्शन तसेच प्रोत्साहन दिलं. याचा नक्कीच फायदा नव तरूणांना होतो. रणजीत पाटील यांनी रूईया महाविद्यालयातील एकांकिकाच्या दिग्दर्शनाची जबाबदारीही सांभाळली होती.
जर तरची गोष्ट या नाटकाचं दिग्दर्शन
सध्या रणजीत पाटील अभिनेत्री प्रिया बापट आणि उमेश कामत यांच्या 'जर तरची गोष्ट' या नाटकाचं दिग्दर्शन करत होते. दिग्दर्शन व्यतिरिक्त त्यांनी आपल्या अभिनयाचं नाणंही खणखणीत वाजवलं. झी मराठीवरील 'ह्रदय प्रीत जागते', या मालिकेत रणजीत यांनी उत्तम अभिनय केला होता. त्यांच्या पात्राचं आणि अभिनयाचं कौतुकही झालं होतं.
रणजीत पाटील यांच्या पश्चात आई अन् वडील असा परिवार
मीडिया रिपोर्ट्सनुसार, रणजीत पाटील यांच्या पश्चात आई - वडील असा परिवार आहे. पाटील यांच्यावर कोल्हापूर येथे अंत्यसंस्कार होणार आहे. रणजीत पाटील यांच्या निधनाची बातमी कळताच मराठी सिनेसृ्ष्टीतील अनेक मान्यवरांनी दु:ख व्यक्त केला आहे. तसेच अनेक चाहते आणि तरूणांनी त्यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा देत भावपूर्ण निरोप दिला आहे. युवा कलाकारांचा आधारस्तंभ हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या
हिंदी सिनेसृष्टीला 'बॉलिवूड' का म्हटले जाते? 'B' अक्षराचा अर्थ काय? यामागे दडलाय रंजक इतिहास