Aastad Kale Share Video: स्टार प्रवाहवरच्या (Star Pravah) 'पुढचं पाऊल' (Pudhcha Paaul) मालिकेमुळे घराघरांत पोहोचलेला अभिनेता आस्ताद काळेनं (Aastad Kale) नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) शेअर केला आहे. आस्ताद काळे कामानिमित्त मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरुन (Mumbai-Pune Expressway) प्रवास करत होता. त्यावेळी तो एका रॅश ड्रायव्हिंग करणाऱ्यापासून थोडक्यात बचावला. आस्तादनं व्हिडीओमधून त्या गाडीचालकावर संताप व्यक्त केला आहे. त्यानं व्हिडीओमध्ये ती गाडी स्पष्ट दाखवली असून ती गाडी राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याची असल्याचाही दावा केला आहे.
मराठी रंगभूमी, तसेच मराठी मालिकांमधून घराघरांत पोहोचलेला आस्ताद काळे नेहमीच वेगवेगळ्या सामाजिक विषयांवर आपलं मत व्यक्त करत असतो. आस्ताद काळे बेधडकपणे सोशल मीडियावर आपलं मत मांडत असतो. मग तो सामाजिक प्रश्न असो वा राजकीय.... अशातच आता आस्तादनं एक्सप्रेसवेवर रॅश ड्रायव्हिंग करणाऱ्याचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. आस्तादनं शेअर केलेला व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
आस्ताद काळे शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये काय म्हणाला?
मराठी अभिनेता आस्ताद काळे म्हणाला की, "ही जी गाडी दिसतेय मारूती सुझूकी. हा एक्सप्रेस हायवेवर अतिशय रफ गाडी चालवतोय. वींडशील्डला एक भगवा झेंडा आहे. आता तो शिंदे सेनेचा आहे की शिवसेनाचा आहे मला माहिती नाही. तेवढं नीट बघता आलं नाही. पण अत्यंत मगरुरीने त्याचं संपूर्ण वर्तन इथे रस्त्यावर चालू आहे. ही गाडी कोणाची आहे याची माहिती जर मिळाली तर कृपया मला कळवा. याने आता माझ्या गाडीला ओव्हर टेक करण्याच्या नादात डावीकडून जोरात एक कट मारला. त्यानंतर दोन गाड्यांनापण अतिशय डेंजरसली कट मारला आहे. याची कोणाला तरी माहिती असेल तर कृपा करून कळवावी."
अभिनेता आस्ताद काळेनं व्हिडीओ शेअर करताना एक कॅप्शनही लिहिलं आहे. त्या कॅप्शनमध्ये आस्ताद काळेनं लिहिलंय की, "1- हे चित्रण करताना मी गाडी चालवत नव्हतो. माझा सारथी गाडी चालवत होता. 2 - गाडीमधे लावलेला झेंडा हा राजकीय ओळख असलेलाच होता. ती नेमकी कुठली ते कळलं नाही."
दरम्यान, मराठी अभिनेता आस्ताद काळेनं आजवर अनेक मराठी सिनेमे आणि मालिकांमध्ये काम केलंय. पुलंच्या गाजलेलं नाटक 'सुंदर मी होणार'मध्येही आस्ताद काळे काम करतोय. स्टार प्रवाहवरील 'पुढचं पाऊल' या मालिकेमुळे आस्ताद काळे प्रकाशझोतात आला. त्यानंतर आस्ताद बिग बॉस मराठीमध्येही स्पर्धक म्हणून सहभागी झालेला. सध्या आस्ताद स्टार प्रवाहवरच्या 'हळद रुसली कुंकू हसलं' या मालिकेत काम करतोय. या मालिकेत आस्ताद अत्यंत वेगळी भूमिका साकारतोय, यापूर्वी आस्तादनं कधीच अशी भूमिका साकारली नव्हती. मालिकेत आस्ताद गावच्या संरपंचाची भूमिका साकारतोय.
महत्त्वाच्या इतर बातम्या :