मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मराठीतले अनुभवी निर्माते मानले जाणारे मंदार देवस्थळी यांच्या आर्थिक विवंचनेबाबत अनेक बातम्या येता आहेत. एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी आपली बाजू मांडली. पण त्या चर्चेत एक अत्यंत महत्वाची बाब समोर आली आहे. मंदार यांच्या या स्थितीला बऱ्याच मोठ्या प्रमाणात मराठी सिनेमा कारणीभूत असल्याचं बोललं जातं आहे.
मंदार यांनी वादळवाट, अभाळमाया, होणार सून मी ह्या घरची या मालिकांवर काम केलं. पण यात महत्वाची बाब अशी की त्यांनी एका चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटाने राष्ट्रीय पुरस्कारही मिळवला आहे. अस असलं तरी बॉक्स ऑफिसवर चित्रपटाला तितके यश न मिळाल्याने निर्माता म्हणून देवस्थळी यांना काही कोटींचा तोटा सहन करावा लागला आहे.
एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी चित्रपटाचा उल्लेख केला आहे. त्यात आपल्याला तोटा झाल्याचंही नमूद केलं आहे. तो चित्रपट म्हणजे कच्चा लिंबू होय. या चित्रपटाचं दिग्दर्शन प्रसाद ओक यांनी केलं होतं. तर यात रवी जाधव, सोनाली कुलकर्णी, सचिन खेडेकर यांच्या मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटाने महोत्सवात बाजी मारली. राष्ट्रीय पारितोषिक मिळवलं. पण बॉक्स ऑफिसवर मात्र हा चित्रपट तितका चालला नाही.
मंदार यांचे अनेक निर्णय चुकले हे त्यांनी सांगितलं आहेच. पण त्यात या चित्रपटावेळी झालेला तोटा मोठा असल्याचं बोललं जातं. यावरून पुन्हा एकदा आपल्याकडे आशयघन चित्रपट चालत नसल्याचं समोर येत. ही बाब केवळ कच्चा लिंबू या चित्रपटाची नाही. तर पुरस्कारात बाजी मिळवलेले धग, नागरिक, लेथ जोशी आदी चित्रपटांची अवस्था अशीच झाली आहे. रसिकाश्रय मिळाला तरच निर्माता तरेल ही काळ्या दगडावरची रेष ठरली आहे.
संबंधित बातम्या :
मला माफ करा, पण मी वाईट माणूस नाही! मंदार देवस्थळी यांनी मांडली आपली स्थिती