लता मंगेशकर यांना देखील ऋषी कपूर यांच्या जाण्याने धक्का बसला आहे. त्यांना दोन ट्वीट करत ऋषी कपूर यांच्याबाबत आठवणींना उजाळा दिला आहे. 'काही दिवसांपूर्वी ऋषीजींनी त्यांचा आणि माझा एक फोटो मला पाठवला होता. ते सगळे दिवस, त्या सगळ्या आठवणी समोर येत आहेत. मी शब्दहीन झाली आहे.' असं लता मंगेशकर यांनी एक फोटो शेअर करत म्हटलं आहे. ऋषी कपूर यांना लता मंगेशकर यांनी कवेत उचलून घेतले असल्याचा हा फोटो आहे.
त्याआधी त्यांनी एक ट्वीट करत 'काय बोलू?, काय लिहू काही समजत नाहीये, ऋषीजींच्या जाण्याने खूप दु:ख झाले आहे. त्यांच्या जाण्याने सिनेक्षेत्राची मोठी हानी झालीय. हे दु:ख सहन करणं माझ्यासाठी कठिण आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती प्रदान करो' असं म्हटलं आहे.
बिग बी अमिताभ बच्चन आणि ऋषी कपूर यांचं खास नातं होतं. त्यांच्या निधनानं बिग बींना प्रचंड मोठा धक्का बसला आहे. ' आज सकाळी तो निघून गेला…ऋषी कपूर… तो निघून गेला… त्याचा मृत्यु झाला आहे मी खरंच खचलोय, उद्धवस्त झालोय”, असं ट्विट अमिताभ बच्चन यांनी केलं होतं. नंतर त्यांनी ते ट्वीट डिलीट केलं.