मुंबई : बॉलिवूड विश्वाला सलग दुसऱ्या दिवशी दुसरा धक्का बसला आहे. हरहुन्नरी कलाकार इरफान खान यांनी काल (29 एप्रिल) जगाला अलविदा केल्यानंतर आज (30 एप्रिल) बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचं निधन झालं. वयाच्या 68 व्या वर्षी त्यांनी मुंबईतील सर एच एन रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. ऋषी कपूर यांना एक आठवड्यापासून रुग्णालयात उपचार सुरु होते. ऋषी कपूर यांचे बंधू रणधीर कपूर यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. सलग दुसऱ्या दोन कलाकार गमावल्याने बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे.
"कॅन्सरच्या आजारातील गुंतागुंतीमुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून ते मागील एक आठवड्यापासून तिथेच आहेत. यावेळी उपचारादरम्यान त्यांना अनेक वेळा व्हेंटिलेटरवर ठेवलं होतं," अशी माहिती सूत्रांनी दिली होती. मात्र आज त्यांची प्राणज्योत मालवली. यावेळी ऋषी कपूर यांच्या पत्नी नीतू सिंह या त्यांच्यासोबत रुग्णालयात होत्या.
ऋषी कपूर मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात अमेरिकेतील न्यूयॉर्कमधून कॅन्सरचा इलाज करुन मुंबईत परतले होते. या उपचारादरम्यान ऋषी कपूर अमेरिकेतील रुग्णालयात 11 महिने आणि 11 दिवस होते. तिथून परतल्यानंतर उपचार यापुढेही सुरु राहतील आणि ठणठणीत बरं होण्यासाठी काही काळ लागेल, असं त्यांनी सांगितलं होतं.
न्यूयॉर्कमध्ये उपचारादरम्यान ऋषी कपूर यांचा मुलगा रणबीर कपूर आणि त्याची गर्लफ्रेण्ड आलिया भट यांच्यासह दीपिका पादूकोण, शाहरुख खान, आमीर खान, अनुपम खेर यांसारख्या अनेक कलाकारांनी ऋषी कपूर यांची भेट घेतली होती. स्वत: ऋषी कपूर आणि नीतू सिंह यांनीही सोशल मीडियावर हे फोटो शेअर केले होते.
न्यूयॉर्कहून परतल्यानंतर ऋषी कपूर 'द बॉडी' नावाच्या चित्रपटात काम केलं होतं. या सिनेमात त्यांच्यासोबत इम्रान हाश्मी आणि शोभिता धुलिपाला प्रमुख भूमिकेत होत्या. चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर विशेष यश मिळालं नाही.
ऋषी कपूर यांची सिनेकारकीर्द
- बॉलिवूडचे चॉकलेट हिरो अशी ओळख असलेल्या ऋषी कपूर यांचा जन्म 4 सप्टेंबर 1952 रोजी झाला होता.
- त्यांची सिनेकारकीर्द जवळपास 50 वर्षांची होती.
- मेरा नाम जोकर चित्रपटातून त्यांनी बालकलाकार म्हणून त्यांनी पदार्पण केलं होतं. तर मुख्य भूमिका असलेला बॉबी हा त्यांचा पहिला चित्रपट होता.
- लैला मजनू, रफुचक्कर, सरगम, कर्ज, प्रेमरोग,नगिना,चांदणी, हिना, बोल राधा बोल,सागर, दामिनी, दिवाना यांसारख्या सुपरहिट सिनेमांसह 93 चित्रपटात त्यांनी प्रमुख भूमिका निभावली.
- पत्नी नीतू सिंह यांच्यासोबत लग्न होण्यापूर्वी त्यांनी सुमारे 12 चित्रपटात एकत्र काम केलं होतं.
- 2008 मध्ये ऋषी कपूर यांना फिल्मफेअरच्या जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं.