Lata Mangeshkar Passes Away : भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनाच्या वृत्ताने देशभरात शोककळा पसरली आहे. लता मंगेशकर यांच्या निधनाने अलौकिक स्वर आज हरपला असल्याची भावना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली. 


लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर मागील 28 दिवसांपासून मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात उपचार सुरू होते. आज सकाळी लता मंगेशकर यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने राजकीय क्षेत्रातूनही शोक व्यक्त करण्यात आला. शरद पवार यांनी ट्वीट करून लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहिली. शरद पवार यांनी म्हटले की, जगभरातील कोट्यवधी संगीतप्रेमींच्या कानांना तृप्त करणारे अलौकिक स्वर आज हरपले. लतादीदींच्या आवाजाच्या परीसस्पर्शाने अजरामर झालेल्या गीतांच्या माध्यमातून हा स्वर आता अनंतकाळ आपल्या मनांमध्ये गुंजन करत राहील.




 


शिवसेना नेते संजय राऊत यांनीदेखील लता मंगेशकर यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. संजय राऊत यांनी ट्वीट करून आदरांजली वाहिली. संजय राऊत यांनी ट्वीट करत 'युग संपले' असल्याचे म्हटले. राऊत यांनी 'तेरे बिना भी क्या जिना'...'एक सूर्य एक चंद्र... एकच लता...'असेही म्हटले आहे. 





लता मंगेशकर यांना 9 जानेवारीच्या रात्री मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांना न्यूमोनियाची देखील लागण झाली होती. त्यानंतर 30 जानेवाराली लता मंगेशकर या कोरोनामुक्त झाल्या होत्या. मात्र, अचानक शनिवारी त्यांची प्रकृती बिघडली. त्यांच्यावर आयसीयूत उपचार सुरू करण्यात आले. मात्र, उपचारा दरम्यान त्यांची प्राण ज्योत मालवली.