Lata Mangeshkar : भारतरत्न स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांच्या प्रकृतीत आता सुधारणा होत असल्याची माहिती आशा भोसले यांनी दिली आहे. आशा भोसले (Asha Bhosle) यांनी ब्रीच कँडी रुग्णालयात जाऊन लता मंगेशकर यांची भेट घेतली आहे. यावेळी डॉक्टरांनी आशा भोसले यांना लता मंगेशकर यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले. लता मंगेशकर यांची प्रकृती शनिवारी (5 फेब्रुवारी) दुपारी पुन्हा गंभीर झाली होती. त्यांना पुन्हा व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले.



लता मंगेशकर यांना 9 जानेवारी रोजी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. वयोमानानुसार त्यांना आरोग्याशी संबंधित इतरही अनेक समस्या आहेत. दरम्यान, त्याच्या लवकरात लवकर बरे वाटावे, यासाठी देशभरातून प्रार्थना केली जात आहेत.


डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू


लता मंगेशकर यांच्यावर उपचार करत असलेले डॉ. प्रतित समदानी यांनी सांगितले की, लता मंगेशकर यांची प्रकृती पुन्हा खालावली आहे. त्यांना व्हेंटिलेटरवर हलवण्यात आले आहे. डॉक्टरांचे एक पथक त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे. डॉक्टर समदानी यांनी असेही सांगितले की, लता मंगेशकर यांना थेरपी दिली जात असून, त्या उपचाराला प्रतिसाद देत आहेत.  


नुकताच त्यांचा व्हेंटिलेटर सपोर्ट काढण्यात आल्याची माहिती मिळाली होती. त्यांचा कोरोना रिपोर्टही निगेटिव्ह आला होता. लता मंगेशकर अजूनही आयसीयू वॉर्डमध्ये असून, डॉक्टरांची टीम त्यांच्या प्रकृतीवर सतत लक्ष ठेवून आहे.


सात दशकांची शानदार कारकीर्द


सात दशकांच्या आपल्या कारकिर्दीत लता मंगेशकर यांनी अनेक भारतीय भाषांमध्ये 30,000 गाणी गायली आहेत. लता मंगेशकर यांना सर्वोच्च भारतीय नागरी पुरस्कार ‘भारतरत्न’, ‘पद्मभूषण’, ‘पद्मविभूषण’, ‘दादासाहेब फाळके’ पुरस्कारांसह अनेक मानाच्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.  


संबंधित बातम्या



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha