Kshitij Patwardhan : लेखक दिग्दर्शक क्षितीज पटवर्धन (Kshitij Patwardhan) याने आतापर्यंत अनेक चिरकाल लक्षात राहणारे सिनेमे आणि नाटक मराठी प्रेक्षकांसाठी तयार केली आहेत. त्याच्या लेखणीवर, दिग्दर्शनावर प्रेक्षक अगदी मनापासून दादही देतात. नुकतच क्षितीज आता बॉलिवूडमध्ये त्याच्या शब्दांच्या जादूने साऱ्यांची मनं जिंकत आहे. 'सिंघम अगेन'चं (Singham Again) लिखाणही त्यानेच केलं आहे. पण मराठी सिनेमातील लेखकांविषयी क्षितीजने केलेल्या व्यक्तव्याने साऱ्यांचंच लक्ष वेधून घेतलं आहे. 


क्षितीजने नुकतीच सौमित्र पोटे यांच्या मित्र म्हणे या पॉडकास्टमध्ये अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. लेखक म्हणून येणाऱ्या अडचणी यामध्ये प्रामुख्याने क्षितीजने सर्वांसमोर ठेवल्या आहेत. त्याचप्रमाणे तो सध्या आणखी दोन बॉलिवूड सिनेमांवर काम करत असल्याचंही क्षितीजने सांगितलं. मराठीत भव्य दिव्य सिनेमा लिहिण्याचं धाडस कोणता लेखक करणार आहे, असा प्रश्नही क्षितीजने यावेळी उपस्थित केला आहे. 


'यामधून एक मराठी सिनेमा म्हणून...'


सिनेमांच्या बाबतीत गरीब विचार करणं सोप्पंय की श्रीमंत विचार करणं सोप्पं आहे.. यावर क्षितीजने म्हटलं की, 'गरीब विचार करणं खूप अवघड आहे..आम्ही मराठीमध्ये जी जी कामं केलेली आहेत, त्या सगळ्यामध्ये प्रचंड प्रमाणात कट टू कट दिवसांचं बजेट, कट टू कट दिवसांच्या गोष्टी करुन कामं केली आहेत. घासून घासून लोकांनी कामं केली आहेत.त्यामुळे यामधून एक मराठी सिनेमा म्हणूनही असं वाटतं की पुढे जावं...'


'भव्य दिव्य सिनेमा लिहिण्याचं धाडस..'


यामुळे आपण श्रीमंत विचार करु शकत नाही का? यावर बोलताना क्षितीजने म्हटलं की, आज मराठीत जर कुणी म्हटलं की, भव्य दिव्य सिनेमा करा... तर भव्य दिव्य सिनेमा लिहिण्याचं धाडस कोणता लेखक करणार आहे. तुम्ही पाच लेखक घे आणि तुम्ही 25 कोटी बजेट असलेला सिनेमा लिहा.. लिहतील लोकं..100 टक्के लिहितील.. कदाचित खूप चांगलंही लिहतील.. पण मराठी सिनेमाबाबत आपली एक समज अशी आहे की, 2 कोटीमध्ये सिनेमा होतो. मग आपण त्याला साऊथशी तुलना करणार, मग तिथे कसे स्टार आहेत.. असं नाही होत..तुम्ही आधी वैचारिक श्रीमंती जन्माला तर घाला... त्यांना म्हणा तर... लिही तू..25 कोटी खर्च येईल अशा सिनेमाची स्क्रिप्ट लिही...


ही बातमी वाचा : 


Marathi Movie : लग्नाआधीची भेट उशीरा झालीये? तेजश्री-सुबोधचा आगामी सिनेमा देणार उत्तर; चित्रपटाचा टीझर रिलीज