Kranti Redkar Death Threat : एनसीपीचे मुंबई झोनचे माजी प्रमुख अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांची पत्नी आणि अभिनेत्री क्रांती रेडकरला (Kranti Redkar) जीवे मारण्याची धमकी आल्याची माहिती समोर येत आहे. क्रांतीने तिच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवरुन ट्विट करत ही माहिती दिली आहे. तिने तिच्या या पोस्टमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यंत्री देवेंद्र फडणवीस यांना टॅग करत कारवाईची मागणी केलीये.
क्रांती रेडकरने तिला हे फोन कॉल्स पाकिस्तान आणि लंडनमधून आल्याचं तिच्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. तसेच ही गोष्टी मागील एका वर्षापासून होत असल्याचं क्रांतीने म्हटलंय. क्रांती ही कायम तिच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत असते. पण सध्या क्रांतीने केलेल्या या पोस्टमुळे बरेच प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
क्रांतीने पोस्टमध्ये काय म्हटलं?
क्रांतीने ट्वीट करत याबाबत भाष्य केलं आहे. तिनं तिच्या पोस्टमध्ये म्हटलं की, माझ्या मोबाईल नंबरवर विविध पाकिस्तानी नंबर आणि ब्रिटनमधून मला जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. हे फक्त तुमच्या निदर्शनास आणून द्यायचे आहे. हे गेल्या एक वर्षापासून होत आहे. पोलिसांना वेळोवेळी कळविण्यात आले. तसेच क्रांतीने तिच्या या पोस्टवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच मुंबई पोलिसांना देखील टॅग केलं आहे.
आर्यन खान प्रकरणापासून समीर वानखेडे चर्चेत
अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला ड्रग्ज प्रकरणात अटक केल्यानंतर समीर वानखेडे चर्चेत आले होते. तसेच, याप्रकरणी मोठी लाच घेतल्याचा आरोप समीर वानखेडेंवर करण्यात आले. तसेच या प्रकरणात समीर वानखेडे यांची ईडी चौकशी देखील करण्यात आली. त्यानंतर समीर वानखेडे आणि क्रांती रेडकर यांना जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याची तक्रार त्यांनी वारंवार पोलीस स्थानकात केली असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.
ही बातमी वाचा :