Snowdrop Actress Park Soo Ryun Passes Away: कोरियन अभिनेत्री पार्क सू रयून (Park Soo Ryun) हिचं आकस्मिक निधन झालं आहे. ती 29 वर्षांची होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 11 जून रोजी पार्क घरी जात असताना पायऱ्यांवरून तिचा पाय घसरला आणि ती खाली पडली होती. त्यानंतर तिला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पायऱ्यांवरुन पडल्यानंतर तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. पार्कला वाचवण्यासाठी डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले, मात्र त्यांचे सर्व प्रयत्न अयशस्वी ठरले. पार्कला ब्रेन डेड घोषित करण्यात आलं. दरम्यान, ज्या दिवशी पॉर्कचा अपघात झाला, त्याच्या एका दिवसानंतर जेजू बेटावर ती परफॉर्म करणार होती. पार्कच्या जाण्यानं कोरियन इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे. पार्क स्नोड्रॉप (Snowdrop South Korean TV Series) या वेब सिरीजमुळे जगभरात प्रकाशझोतात आली होती. 


कोरियन अभिनेत्री पार्क सू रयूनच्या आकस्मिक निधनानं जगभरातील तिच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. डॉक्टरांनी अभिनेत्रीला ब्रेन डेड घोषित केल्याचं मीडिया रिपोर्ट्समधून सांगण्यात येत आहे. आज, 13 जून रोजी पार्कवर अंत्यसंस्कार होणार आहेत. पार्कनं अनेक कोरियन शो केले. मात्र तिला खरी ओळख मिळाली ती तिच्या स्नोड्रॉप या कोरियन टीव्ही सीरिजमुळे. स्नोड्रॉपमध्ये पार्कची भूमिका अगदी काही वेळाचीच आहे. पण पार्क आपल्या अभिनयाच्या जोरावर अनेकांवर छाप पाडते. भारतातही पार्कची स्नोड्रॉप ही सीरिज खूप प्रसिद्ध झाली होती. 


आई-वडिलांनी घेतला अवयवदानाचा निर्णय 


अभिनेत्री पार्क सू रयून हिच्या कुटुंबानं तिचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला आहे. Soompi च्या रिपोर्टनुसार, पार्कच्या आईनं सांगितलंय की, 'पार्कचा मृत्यू ब्रेन डेडमुळे झाला आहे. तिचे हृदय अजूनही धडधडत आहे. जगात कोणीतरी नक्कीच असेल ज्याला अवयवांची नितांत गरज आहे. पार्कचे आईवडील या नात्यानं आम्हाला हा विचार करुन खरंच आनंद होतोय की, तिचं हृदय दुसर्‍या कोणाकडे तरी असेल आणि ते धडधडत राहिल."


कोण होती पार्क सू रयून?


2018 मध्ये, अभिनेत्री पार्क सू रयूनने Il Tenore मधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं. यानंतर ती फाईंडिंग मिस्टर डेस्टिनी, द डेज वी लव्हड, सिद्धार्थ संग इतर म्युझिकल अल्बम्समध्ये दिसली होती. तिनं कोरियन शो 'स्नोड्रॉप'मध्ये काम केलं आहे. याच शोमुळे तिला खरी ओळख मिळाली. तिच्या भूमिकेबद्दल बोलताना अभिनेत्रीनं सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले होते. तिनं सांगितलं होतं की, शोमध्ये तिची भूमिका खूपच लहान असली तरीही तिची सेटवर खूपच काळजी घेतली जात होती. यासोबतच तिनं अभिनेता Jung Hae सोबत पुन्हा काम करण्याची संधी मिळेल, अशी आशाही व्यक्त केली होती.